Join us

‘दुष्काळावर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 2:53 AM

पिककर्ज २५ टक्केच शेतकऱ्यांना मिळालेले आहे. लाखो शेतकरी कर्जाच्या प्रतिक्षेत आहेत.

मुंबई : जुलै महिना संपत आला तरी राज्यात अजून समाधानकारक पाऊस झालेला नाही. खरिपाच्या ५० टक्केही पेरण्या झालेल्या नाहीत. आताच दुष्काळासारखी परिस्थिती आहे, त्यामुळे सरकारने तातडीने दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, खरिप हंगाम धोक्यात आला, पेरणी वाया गेली आहे. धानाची रोपे करपली. सोयाबीन धोक्यात आले आहे. दुबार पेरणीची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या हातात दमडीही नाही. कर्जमुक्तीपासून ३० लाख शेतकरी अजून वंचित आहेत. विदर्भात ३० टक्केही पाऊस झालेला नाही. जुलै महिन्यात नागपूर शहरात ३ दिवसाआड पाणी कपात सुरु असून जुलै महिन्यात ही स्थिती असेल तर पुढे पाण्यासाठी तळमळून मरण्याची वेळ येईल.

पिककर्ज २५ टक्केच शेतकऱ्यांना मिळालेले आहे. लाखो शेतकरी कर्जाच्या प्रतिक्षेत आहेत. बँका नाडवत आहेत. यासाठी सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलावून दुष्काळी उपाययोजनांवर चर्चा करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

टॅग्स :विजय वडेट्टीवार