थंडीमुळे आजारांना निमंत्रण, श्वसनाचा त्रास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 05:36 AM2020-01-05T05:36:59+5:302020-01-05T05:37:08+5:30

थंडीचे प्रमाण वाढल्याने थंडी, ताप, डोकेदुखी, श्वसनाच्या विकारांनी डोके वर काढले आहे.

Inviting illnesses due to cold, shortness of breath | थंडीमुळे आजारांना निमंत्रण, श्वसनाचा त्रास

थंडीमुळे आजारांना निमंत्रण, श्वसनाचा त्रास

googlenewsNext

मुंबई : थंडीचे प्रमाण वाढल्याने थंडी, ताप, डोकेदुखी, श्वसनाच्या विकारांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे डॉक्टरांकडे या आजारांनी त्रस्त असणारे रुग्ण वाढले आहेत. दमा, संधिवाताचे आजारही या काळात बळावत असल्याने काळजी घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
गेल्या काही दिवसांत शहर, उपनगरात अनेक वर्षांनंतर तापमानाचा पारा घसरला आहे. मात्र हा पारा घसरल्याने मुंबईकरांना चांगलीच थंडी जाणवू लागली आहे. त्यामुळे या काळात अनेकांना सर्दी, पडसे, घसा, हात-पाय दुखणे असे त्रास होतात.
दम्याच्या रुग्णांना थंडीत दम लागण्याचे प्रमाण वाढते. त्याबरोबरच पूर्वी फ्रॅक्चर होऊन गेलेल्या रुग्णांनाही थंडीत फ्रॅक्चर झालेले अवयव दुखण्याचा त्रास होऊ शकतो. थंडी वाढल्याने सर्दी, ताप, सायनस, खोकला वाढत आहे. थंडीमुळे श्वसनाचे आजारही वाढत असल्याने असे त्रास असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याचे फिजिशियन डॉ. रश्मी घरत यांनी सांगितले.
थंडीत विषाणूजन्य आजारांमध्ये वाढ होते. ज्येष्ठ नागरिकांचे सांध्याचे दुखणे या मोसमात वाढते. शिवाय या काळात अ‍ॅलर्जीमुळेही अनेकांना सर्दी, ताप, खोकला याचा त्रास होतो. औषधोपचाराने तो बरा करता येतो. मात्र, असे असले तरी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय परस्पर कुठलीही औषधे घेऊ नयेत, असा सल्ला फिजिशियन डॉ. दिलीप शहा यांनी दिला.
>व्यायामही करा जपून
किमान १५ मिनिटांच्या व्यायामामुळे एन्डॉर्फिन नावाचे संप्रेरक शरीरात तयार होते. हे संप्रेरक थंडीशी लढून शरीराला उष्णता देण्यास मदत करते. त्यामुळे ज्येष्ठांनी सकाळी १५ मिनिटे आणि संध्याकाळी १५ मिनिटे व्यायाम करावा. व्यायाम बगिचात किंवा मैदानातच केला पाहिजे असे अजिबात नाही. तो घरातही करता येतो. त्यामुळे शक्यतो हिवाळ्यात पहाटे उठून व्यायाम करत असल्यास योग्य ती काळजी घ्यावी. अतिव्यायामही शरीरास घातक ठरू शकतो, असा सल्ला वैद्यकीय तज्जांनी दिला.
>अशी घ्या काळजी
थंडीच्या मोसमात बाहेर पडताना काळजी घ्यावी. थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून स्वेटर, मफलर, कानटोपीचा वापर करावा. सर्दी झाल्यास गरम पाण्याच्या वाफा घ्याव्यात. बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे. सकाळी आणि संध्याकाळी थंडीचे प्रमाण वाढते. त्यामुळे या काळात घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी. त्रास होत असल्यास त्वरित वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.
>वयाच्या साठीनंतर त्वचेचा मांसपेशींशी असलेला संपर्क कमी होतो. त्यामुळे ज्येष्ठांची त्वचा सैल पडते. या सैल त्वचेवर बाहेरच्या वातावरणाचा लवकरच परिणाम होतो. उन्हाळ्यात तरुणांच्या तुलनेत जास्तीचा घाम येणे, उष्णता वाढणे किंवा थंडीत अधिक हुडहुडी भरणे हे त्यामुळेच घडते.
शिवाय या वयात शरीराला रक्तपुरवठा करणाºया नसादेखील कमजोर होतात. त्यामुळे थंडीत कायम उबदार कपडे अंगावर ठेवावेत, असा सल्ला वैद्यकीय तज्जांनी दिला.

Web Title: Inviting illnesses due to cold, shortness of breath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.