‘इप्टा’ची चुरस १५ सप्टेंबरपासून रंगणार!
By admin | Published: September 13, 2014 01:38 AM2014-09-13T01:38:23+5:302014-09-13T01:38:23+5:30
फेस्टिव्हलचे दिवस सुरू झाल्याने सध्या कॉलेजियन्स जोशात आहेत. त्यातच सध्या एकांकिका स्पर्धांचे वारे वाहू लागल्याने रंगकर्मींमध्ये अधिक उत्साह आहे
सायली कडू, माटुंंगा
फेस्टिव्हलचे दिवस सुरू झाल्याने सध्या कॉलेजियन्स जोशात आहेत. त्यातच सध्या एकांकिका स्पर्धांचे वारे वाहू लागल्याने रंगकर्मींमध्ये अधिक उत्साह आहे. हिंदी रंगभूमीवर कला सादर करण्याची संधी कॉलेज जीवनापासूनच देण्यास ‘इप्टा’ अर्थातच ‘इंडियन पीपल्स थिएटर’चे योगदान अधिक आहे. ‘इप्टा’ची प्राथमिक फेरी १५ सप्टेंबरपासून माटुंगा येथील म्हैसूर असोसिएशन आॅडिटोरिअममध्ये रंगणार असून कॉलेजियन्समध्ये चुरस वाढली आहे.
युथ फेस्टिव्हलच्या अंतिम फेरीच्या तारखांचा आणि इप्टाच्या प्राथमिक फेरीचा घोळ झाल्याने ही कलाकार मंडळी आता काय करावे, अशा संभ्रमात पडली. मात्र यावर काहींनी मागे न हटण्याचा तर काहींनी कोणत्याही एक स्पर्धेत पूर्णपणे सहभागी होण्याचा निर्णय घेतला. याबाबत बोलताना गेली ११ वर्षे लागोपाठ पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या मिठीबाई कॉलेजचा करण भानुशाली म्हणतो, ‘यंदा युथ फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालो असल्याने इप्टामध्ये सहभागी न होण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. गेली ११ वर्षे सतत आम्ही पहिला क्रमांक पटकावत आलो आहोत, त्यामुळे आयोजकांनीही आम्हाला धीर देत सहभागी होण्यास सांगितले. काहीही ठरवले नसताना आम्ही इप्टामध्ये सहभागी झालो. आता दिवस-रात्र एक करून आमची प्रॅक्टिस सुरू आहे.’
एकांकिकेच्या स्क्रिप्टवर अधिक लक्ष देत असून रसिक प्रेक्षकांची अपेक्षा आमच्याकडून वाढली आहे. तरी मिठीबाई कॉलेज बेस्टच सादर करण्याचा विश्वास सर्वांनी आमच्यावर दाखवला आहे. तो आम्ही सांभाळून बेस्ट शो देण्याचा निश्चय केला आहे, असे करण पुढे म्हणाला. अशीच काहीशी द्विधा मन:स्थिती दालमिया कॉलेजच्या विद्यार्थ्यांची झाली. मात्र इप्टामध्येच सहभागी होऊन केवळ एकाच स्पर्धेत पूर्णपणे सहभागी व्हायचे, असा निश्चय करून प्रॅक्टिस सुरू असल्याचे प्रमित बारोट याने सांगितले.
काही वर्षांच्या गॅपनंतर पुन्हा दमदार स्क्रिप्ट घेऊन उतरत असल्याचे अंधेरीच्या भवन्स कॉलेजचे दिग्दर्शक विपुल म्हागवकर यांनी सांगितले. यंदा ‘आयएनटी’ स्पर्धासुद्धा याच दरम्यान सुरू होत आहेत. त्यामुळे दोन्हीपैकी एक स्पर्धा निवडणेच योग्य
ठरणारे होते. याआधी आयएनटीमध्ये सहभागी झालो होतो त्यामुळे एक वेगळा अनुभव, एक वेगळी स्पर्धा करण्याचा निर्णय आम्ही घेतला. कॉलेजनेसुद्धा जबाबदारी टाकली आहे. आणि विद्यार्थ्यांनीही विश्वास ठेवला त्यामुळे दणक्यात ‘कमबॅक’ करण्याचा आमचा विचार आहे. इप्टा मुंबईच्या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचे यंदाचे ४३ वे वर्ष आहे.