आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 05:57 PM2024-09-20T17:57:09+5:302024-09-20T17:57:18+5:30
iPhone 16 Series: मुंबईच्या बीकेसीमधील Apple स्टोअरवर iPhone 16 घेण्यासाठी ग्राहकांनी लांब रांगा केल्या.
iPhone 16 Series: Apple ने आजपासून आपल्या बहुप्रतिक्षित iPhone 16 ची भारतात विक्री सुरू केली आहे. हा फोन घेण्यासाठी ग्राहकांमध्ये प्रचंड उत्साह दिसतोय. मुंबई, दिल्लीत तर Apple स्टोर उघडण्याआधीच ग्राहकांनी लांब रांगा लावल्याचे पाहायला मिळतेय. मुंबईच्या बीकेसीमधील स्टोअरबाहेरही ग्राहकांची सकाळपासूनच तोबा गर्दी झाली आहे. यावरुनच भारतात ॲपल आयफोनविषयी लोकांमध्ये असलेली क्रेझ दिसून येते. दरम्यान, मुंबईतील ॲपल स्टोअरमध्ये आलेल्या एका ग्राहकाचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने जारी केलेल्या व्हिडिओजमध्ये मोठ्या संख्येने लोक iPhone 16 खरेदी करण्यासाठी बीकेसीतील स्टोअरमध्ये पोहोचल्याचे दिसत आहे. यदरम्यान, एका ग्राहकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्याने एक-दोन नव्हे, तर तब्बल पाच iPhone 16 खरेदी केले आहेत. या व्यक्तीने स्वतःसह पत्नी आणि मुलांसाठी पाच फोन्स खरेदी केले आहेत.
#WATCH महाराष्ट्र: मुंबई के बीकेसी में कंपनी के स्टोर पर बड़ी संख्या में लोग आईफोन 16 खरीदने के लिए पहुंचे।
— ANI_HindiNews (@AHindinews) September 20, 2024
एक ग्राहक ने कहा, "मैंने 5 मोबाइल बीबी और बच्चों के लिए लिया है। यहां का सर्विस बहुत अच्छा है.." https://t.co/spxeNY4nFKpic.twitter.com/Uekf88MUVk
व्हिडिओमध्ये iPhone 16 खरेदी केल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे दिसतोय. व्हिडिओमध्ये त्याने खरेदी केलेला एक एक आयफोन बॉक्सबाहेर काढून दाखवला. या आयफोनवेड्या मुंबईकराचा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होतोय. या व्हिडिओवर लोकही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘हा आता दुसऱ्या देशात जाऊन हे आयफोन विकणार’, दुसऱ्या एका युजरने म्हटले की, ‘या व्यक्तीचा इनकम टॅक्स रेकॉर्ड चेक केला पाहिजे.’ तिसऱ्या युजरने म्हटले की, ‘मायानगरी मुंबईची गोष्टचं काही वेगळी आहे.’
iphone चे 4 मॉडेल्स उपलब्ध
कंपनीने आयफोन 16 सीरीजचे चार मॉडेल्स आणले आहेत. iPhone 16 ची सुरुवातीची किंमत 79,900 रुपये आहे. तर, iPhone 16 Plus Rs 89,900, iPhone 16 Pro 1,19,900 आणि iPhone 16 Pro Max 1,44,900 रुपयांना मिळेल.