‘आयपीएलच्या बॅनर’मुळे पश्चिम रेल्वेला ‘ब्रेक’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 09:03 PM2018-04-16T21:03:22+5:302018-04-16T21:03:22+5:30
वानखेडेवर लावलेला आयपीएलचा बॅनर ओव्हरहेड वायवर पडल्याने पश्चिम रेल्वेला ब्रेक
मुंबई : देशभरात आयपीएलचे जोरदार वारे वाहत आहेत. आयपीएल बॅनर मुळे पश्चिम रेल्वेवरील धीम्या मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाल्याची घटना सोमवारी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. सायंकाळी गर्दीच्या वेळेत घडलेल्या घटनेने प्रवाशांना पायपीट करत चर्चगेट स्थानक गाठावे लागले.
चर्चगेट जवळील वानखेडे स्टेडियमच्या बाहेर आयपीएलचे मोठे बॅनर लावण्यात आले आहे. यापैकी सुमारे ३० फूट बाय १० फूट आकाराचा बॅनर धीम्या मार्गावरील ओव्हरहेड वायरवर पडला. यामुळे धीम्या मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली. सायंकाळी ५ वाजून २० मिनिटे ते ५ वाजून ३० मिनिटापर्यंत चर्चगेट फलाट क्रमांक १ आणि २ वरील वाहतूक बंद करण्यात आली होती. आयपीएलचा बॅनर ओव्हरहेड वायरवरुन दूर करत त्वरीत लोकल सुरु केल्याचा दावा पश्चिम रेल्वेने केला आहे.
मात्र ओव्हरहेड वायरमधील विद्यूत पुरवठा खंडीत झाल्यामुळे लोकल जागीच उभ्या होत्या. चर्चगेट ते मरिन लाईन्स स्थानकादरम्यान धीम्या मार्गावरील लोकल सेवा पूर्णत: कोलमडली. गर्दीच्या वेळेत हा प्रकार घडल्यामुळे प्रवाशांमधून या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. या प्रकारामुळे पश्चिम रेल्वेच्या धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्यांचे वेळापत्रक कोलमडल्याने लोकल बऱ्याच उशिराने धावत होत्या. आयपीएल बॅनर प्रकरणी पश्चिम रेल्वे संबंधित यंत्रणेवर नक्की काय कारवाई करते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.