Aaditya Thackeray, IPL 2022: "प्रश्न हा आहे की युवराजांनी..."; मुंबईतील क्रिकेट सामन्यांवरून आदित्य ठाकरेंना मनसेचा खोचक सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 07:15 PM2022-03-17T19:15:35+5:302022-03-17T19:16:13+5:30
IPLचे सामने २६ मार्चपासून
MNS slams Aaditya Thackeray | IPL 2022 चा हंगाम सुरू होण्यापूर्वी सर्व संघ मुंबईत जमायला सुरूवात झाली आहे. मुंबईतील तीन वेगवेगळ्या मैदानांवर लीगचे सामने होणार आहेत. पण त्यापूर्वी मुंबईतील ताज हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाच्या बसची तोडफोड करण्यात आली. Raj Thackeray यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) ५-६ कार्यकर्त्यांनी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या बसची तोडफोड केली. हे प्रकरण ताजं असतानाच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी IPL वरून राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
आदित्य ठाकरे हे राज्याचे मंत्री तसेच मुंबईचे पालकमंत्री आहेत. आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील IPL सामन्यांआधी सर्व गोष्टींची पाहणी केली आहे. तसेच IPL संबंधित गोष्टींवर त्यांचं लक्ष आहे. मुंबईतील तीन वेगवेगळ्या स्टेडियममध्ये IPL चे एकूण ५५ लीग सामने खेळवले जातील. हे सामने सीसीआय, डी वाय पाटील आणि वानखेडे मैदानावर होणार आहेत. तशातच मनसेचे संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंना खोचक प्रश्न विचारला. "महाराष्ट्रामध्ये IPL चे सामने भरवून जर स्थानिक भूमिपुत्रांना फायदा होणार नसेल, तर प्रश्न हा आहे की युवराजांनी हा सगळा पुढाकार स्वतःचं अर्थचक्र फिरवायला घेतलाय की महाराष्ट्राचं??", असं खोचक ट्वीट त्यांनी केलं.
महाराष्ट्रा मध्ये ipl चे सामने भरवून जर स्थानिक भूमिपुत्रांना फायदा होणार नसेल तर प्रश्न हा आहे युवराजांनी हा सगळा पुढाकार स्वतःच अर्थ चक्र फिरवायला घेतलाय की महाराष्ट्रच??
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) March 17, 2022
दरम्यान, बसची तोडफोड प्रकरणी कुलाबा पोलिसांनी प्रशांत गांधी, संतोष जाधव, बाजीराव कुंभार, भरमु नागरूनकर आणि देवेंद्र परमेकर मनसैनिकांना अटक केली. पोलिसांकडून त्या मनसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि कलम १४३, १४७, १४९ आणि ४२७ नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला आहे. सुदैवाची बाब म्हणजे, ही बस पार्किंगमध्ये असल्याने बसमध्ये कोणीही नव्हते. त्यामुळे या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. बसची तोडफोड करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आहेत. ताज हॉटेलजवळ उभ्या असलेल्या बसेसची तोडफोड केली. आयपीएलमध्ये संघांनी बसचे कंत्राट बाहेरील राज्याच्या म्हणजेच दिल्लीच्या कंपनीला दिल्याचा आरोप करत ही तोडफोड करण्यात आली. हे कंत्राट स्थानिक कंपनीला म्हणजेच महाराष्ट्राला दिले जायला हवे, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली.