IPL Mumbai: मुंबईत 26 मार्चपासून आयपीएल सामने, 'या' प्रेक्षकांनाच मिळणार मैदानात एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 09:55 PM2022-03-02T21:55:13+5:302022-03-02T21:57:55+5:30

सह्याद्री अतिथीगृहात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित बैठकीत आयपीएल- २०२२ सामन्यांच्या वेळी करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला

IPL Mumbai: IPL matches from March 26 in Mumbai, only these spectators will get entry in the field, aditya Thackeray tweet | IPL Mumbai: मुंबईत 26 मार्चपासून आयपीएल सामने, 'या' प्रेक्षकांनाच मिळणार मैदानात एन्ट्री

IPL Mumbai: मुंबईत 26 मार्चपासून आयपीएल सामने, 'या' प्रेक्षकांनाच मिळणार मैदानात एन्ट्री

Next

मुंबई - २६ मार्चपासून आयपीएल-२०२२ चा प्रारंभ होत असून मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथे आयपीएलचे सामने होणार आहेत. त्यासाठी पोलिस, महानगरपालिका यांच्यासह मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआय यांनी समन्वयाने काम करुन आयपीएल-२०२२ स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्याचे आवाहन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी संयुक्तपणे केले आहे. विशेष म्हणजे यंदा आयपीएल सामने पाहण्यासाठी २५ टक्के मर्यादेत प्रेक्षकांना मैदानात हजेरी लावता येणार आहे.  

सह्याद्री अतिथीगृहात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित बैठकीत आयपीएल- २०२२ सामन्यांच्या वेळी करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. बैठकीला बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल, पोलीस आयुक्त संजय पाण्डेय, नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर, ठाणे महापालिका आयुक्त विपीनकुमार शर्मा, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या टी-२० गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर, कार्यकारी सचिव सी.एस. नाईक, आयपीएलचे प्रमुख हेमांग अमिन यांचेसह वरिष्ठ पोलीस, महापालिका अधिकारी उपस्थित होते.

कोविड प्रतिबंधात्मक नियम आणि सुरक्षा या दृष्टीने विचार करुन आयपीएल २०२२ स्पर्धा घ्याव्या लागणार आहेत. गेली दोन वर्षे कोविडच्या प्रादुर्भावामुळे आयपीएलसारख्या स्पर्धा मुंबईत होऊ शकल्या नाहीत, त्यामुळे क्रिकेटप्रेमींना हे सामने पाहता यावेत त्याचबरोबर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुण्यातील अर्थव्यवस्थेला या स्पर्धेमुळे गती मिळावी या उद्देशाने बीसीसीआयशी चर्चा करुन आयपीएल-२०२२ चे आयोजन करण्यात आले आहे, असे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. मुंबई, नवी मुंबई, ठाणे येथील पोलीस, महापालिका यांनी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याच्या सूचना देतानाच सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करा, त्यासाठी एसओपी तयार करण्याचे निर्देश मंत्री ठाकरे यांनी यावेळी दिले.

कोविड रुग्णांची संख्या कमी होत असल्याने २५ टक्के प्रेक्षकांची उपस्थिती मर्यादा ठेवण्यात आली असून लसींचे दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले. यापूर्वी एशिया फेडरेशन फुटबॉल स्पर्धा यशस्वीपणे पार पडली असून आयपीएलनंतर ‘फिफा’चे देखील आयोजन करण्यात येणार असल्याचेही मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

कोविडनंतर पहिल्यांदा आयपीएलचे सामने होणार असल्याने खेळाडू निवास करीत असलेल्या हॉटेल्सपासून स्टेडियमपर्यंत जाणाऱ्या रस्त्यांवर ग्रीन कॉरिडॉर तयार करण्याच्या सूचना नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिल्या. खेळाडू राहत असलेले हॉटेल्स, सराव मैदाने, स्टेडियम या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्याचे निर्देशही शिंदे यांनी दिले. या स्पर्धांचे ब्रॅण्डिंग करुन वातावरण निर्मिती करण्यासाठी संबंधित महानगरपालिकांनी उपक्रम राबविण्याच्या सूचना देतानाच सराव मैदानांची आणि परिसराची दुरुस्ती करण्यासाठी महानगरपालिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही नगरविकासमंत्री शिंदे यांनी केले.

आयपीएलमध्ये ७० सामने खेळवले जाणार

२६ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल-२०२२ स्पर्धा २२ मे पर्यंत चालणार असून यात विविध १० संघ सहभागी होणार असून एकूण ७० लीग सामने खेळवले जाणार आहेत. मुंबईत वानखेडे स्टेडियमवर २०, ब्रेबॉर्न स्टेडियमवर १५ आणि नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये २० सामने होणार आहेत तर १५ सामने पुण्याच्या एमसीएच्या इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहेत. या सामन्यांसाठी १४ किंवा १५ मार्चपासून बीकेसी आणि ठाणे येथील एमसीएचे मैदान, ब्रेबॉर्न स्टेडियम, डीवाय पाटील स्टेडियम, नवी मुंबईतील रिलायन्स कार्पोरेट पार्क येथे खेळाडूंचा सराव सुरु होणार आहे.

Web Title: IPL Mumbai: IPL matches from March 26 in Mumbai, only these spectators will get entry in the field, aditya Thackeray tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.