सत्तांतर नाट्यामुळे आयपीएस अधिकाऱ्यांत ‘कहीं खुशी कहीं गम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 05:53 AM2019-11-13T05:53:40+5:302019-11-13T05:53:44+5:30
तीन आठवडे उलटूनही राज्यात सत्ता कोणाची, याबाबत अद्याप अनिश्चितता असल्याने वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या वर्तुळात प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.
जमीर काझी
मुंबई : विधानसभा निवडणूक निकाल लागून तीन आठवडे उलटूनही राज्यात सत्ता कोणाची, याबाबत अद्याप अनिश्चितता असल्याने वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या वर्तुळात प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. भाजप सोडून इतर पक्षांचे सरकार स्थापन होण्याच्या शक्यतेमुळे त्यांच्यात ‘कहीं खुशी कहीं गम’ची परिस्थिती आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी अन्य मुख्यमंत्री बनल्यास अनेक पोलीस आयुक्तांसह महत्त्वाच्या ‘क्रीम पोस्टिंग’वरील पदांवर लवकरच फेरबदल केले जातील, हे निश्चित मानले जात आहे.
सत्ताबदल झाल्यास फडणवीस यांच्या मर्जीतील अनेक अधिकाºयांना नव्या सरकारकडून बाजूला हलविले जाईल, तर गेल्या पाच वर्षांपासून अडगळीत पडलेल्या अनेकांना पुन्हा महत्त्वाची पदे मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींकडे सर्वसामान्यांबरोबरच वरिष्ठ पोलीस अधिकाºयांचे लक्ष लागून राहिले आहे.
निवडणुकीत भाजप-शिसेनेला बहुमत मिळूनही मुख्यमंत्रिपद वाटपाच्या ‘फिफ्टी-फिफ्टी’ फार्म्युल्यावर एकमत झाले नाही. त्यामुळे सेनेने भाजपची साथ सोडून परंपरागत विरोधी कॉँग्रेस-राष्टÑवादी कॉँग्रेस यांना सोबत घेत सरकार स्थापन करण्याची तयारी चालविली आहे. तीनही पक्षांच्या नेत्यांमध्ये एकमत झाल्यास भाजप वगळून नवीन सरकार अस्तित्वात येऊ शकते. परंतु त्यांच्यात अद्याप पूर्णपणे एकमत झालेले नाही. त्यातच राष्टÑपती राजवट लागू झाली आहे. त्यामुळे त्यावर अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारचे वर्चस्व राहणार आहे. अशा परिस्थितीत पोलीस दलातील महत्त्वाच्या पदांवरील नियुक्त्यांमध्ये फारसे बदल होणार नाहीत.
शिवसेना-कॉँग्रेस आघाडीचे सरकार स्थापन झाल्यास अधिकाºयांच्या लवकरच बदल्या केल्या जातील, राष्टÑवादी कॉँग्रेस गृह खाते आपल्याकडे ठेवण्यासाठी आग्रही राहील, अशी परिस्थिती असून त्यांच्याकडून प्रशासकीय कारणास्तव फेरबदल केले जातील हे निश्चित आहे.
विशेषत: फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी जे गेल्या पाच वर्षांपासून महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत, त्यांना अन्यत्र हलविण्यात येईल आणि जे अडगळीत आहेत, त्यांना कॉँग्रेस, आघाडीच्या नेत्यांच्या मर्जीमुळे महत्त्वाच्या पदांवर नियुक्त्या दिल्या जातील, अशी शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय नाट्याकडे हे अधिकारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
>मुंबईच्या आयुक्तांना मिळणार पुन्हा मुदतवाढ?
मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची तीन महिन्यांची मुदतवाढ ३० नोव्हेंबरला संपत आहे. मात्र, त्यांना पुन्हा ३ महिने मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे भाजपला वगळून सेना स्वतंत्रपणे सत्तेवर आल्यास त्यांना फारसा फरक पडणार नाही. मात्र, सत्ताबदल झाल्यास दिल्लीत सत्तेवर असलेला भाजप आणि राज्यातील सत्तेतील भागीदार राष्टÑवादी कॉँग्रेस यांची भूमिकाही महत्त्वाची ठरेल. त्याशिवाय आगामी आयुक्त, एसआयडी, एटीएससह राज्यभरातील अनेक महत्त्वाच्या पदांवर बदल होण्याची शक्यता आहे.