Join us

परदेशी नागरिकाचा तपशील चोरून घेतली आयपीएलची तिकिटे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 1:42 AM

आयपीएल सामन्यांची तिकीट खरेदी केली. नंतर तीच तिकिटे सवलतीच्या दरात विकल्याचा धक्कादायक प्रकार सायबर पोलिसांच्या कारवाईतून उघड झाला.

मुंबई : परदेशी नागरिकाच्या क्रेडिट कार्डचा तपशील चोरून, त्यातूनच गैरमार्गाने सोमवारी पार पडलेल्या मुंबई विरुद्ध बँगलोर या आयपीएल सामन्यांची तिकीट खरेदी केली. नंतर तीच तिकिटे सवलतीच्या दरात विकल्याचा धक्कादायक प्रकार सायबर पोलिसांच्या कारवाईतून उघड झाला. या कारवाईमुळे ५४ क्रिकेटप्रेमींना, प्रवेश करण्यापूर्वीच पोलीस कारवाईला तोंड द्यावे लागले.आकाश घोसालीया, केवल घोसालीया, मनीष मोनानी आणि विजय राजपूत या चौकडीला सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कॅनडा येथील नागरिकाच्या क्रेडिट कार्डचा तपशील या चौकडीने चोरला. बनावट कार्डच्या आधारे सोमवारच्या आयपीएल सामन्याची ६८ तिकिटे खरेदी केली. ही बाब परदेशी नागरिकाला समजताच त्यांनी बँकेकडे विचारणा केली. याबाबत मुंबईच्या बँकेकडून बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. चौकडीने २० ते ३० टक्क्यांच्या सवलतीमध्ये ही तिकिटे विकली. सामन्यादरम्यान वानखेडे स्टेडियमबाहेरून तिकीट घेत, क्रिकेटप्रेमी आत जाणार त्यापूर्वीच सायबर पोलिसांनी ५४ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील तिकिटांबाबत चौकशी करताच, चौकडीची नावे उघड झाली.