Join us

आयपीएस सदानंद दाते यांची केंद्रातून ‘घरवापसी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 1:39 AM

प्रतिनियुक्तीवर न्याय विभागात होते पाच वर्षे; काही दिवस सक्तीची प्रतीक्षा

- जमीर काझी मुंबई : मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार, याबाबत राज्यात उत्सुकता लागून राहिली असताना, केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेले ज्येष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांची ‘घरवापसी’ झाली आहे. राज्य पोलीस दलाच्या सेवेत बुधवारपासून रुजू झाले आहेत. महाविकास आघाडी सरकारकडून त्यांच्यावर लवकरच महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाईल. मात्र, मुंबईच्या आयुक्तपदाच्या निवडीवेळी त्यांचीही नियुक्ती केली जाण्याची तूर्तास शक्यता नाही, असे गृह विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.केंद्रीय न्याय विभागात दाते हे सहसचिव म्हणून गेली पाच वर्षे कार्यरत होते. मंगळवारी त्यांची मुदत संपल्यानंतर ते तातडीने दिल्लीहून परतले. सध्या काही दिवस तरी त्यांना सक्तीच्या प्रतीक्षेत (कम्पल्सरी वेटिंग) राहावयास लागणार आहे. मूळचे पुण्याचे असलेले सदानंद दाते हे १९९०च्या आयपीएस तुकडीतील अधिकारी आहेत. मुंबई गुन्हा अन्वेषण शाखेत सहआयुक्त म्हणून काम पाहात असताना, त्यांची २५ फेबु्रवारी, २०१५ रोजी दिल्लीला न्याय विभागात प्रतिनियुक्ती झाली.मार्च अखेरपर्यंत नियुक्तीची शक्यतादाते मितभाषी, प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी सीबीआयसह, मुंबई क्राइम ब्रॅँच, फोर्स वनमधील जबाबदारी सक्षमपणे सांभाळली आहे. त्यामुळे राज्य गुप्तवार्ता विभाग (एसआयडी), दहशतवाद विरोधी पथक(एटीएस) पुणे आयुक्त यांसारख्या महत्त्वाच्या पदी नियुक्तीची शक्यता आहे. सेवाज्येष्ठतेनुसार एसआयडीच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांची पदोन्नती केली जाईल, त्यामुळे त्यांच्या जागी दाते यांची नियुक्ती होऊ शकते. माजी आयुक्त राकेश मारिया यांनी केलेल्या आरोपामुळे चर्चेत आलेल्या देवेन भारती यांच्यावर अन्य जबाबदारी देऊन एटीएसप्रमुख किंवा पुण्याचे आयुक्त म्हणून त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.