Join us

Himanshu Roy: IPS अधिकारी हिमांशू रॉय यांची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2018 2:21 PM

हिमांशू रॉय हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते.

मुंबईः राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि दहशतवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख हिमांशू रॉय यांनी आज डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्यानं पोलीस दलात खळबळ उडाली आहे. गेल्या काही काळापासून त्यांना कॅन्सरनं ग्रासलं होतं. या आजाराला कंटाळूनच त्यांनी आत्महत्या केल्याचं समजतं.

गेल्या दोन वर्षांपासून हिमांशू रॉय 'सिक लिव्ह'वर होते. फिटनेसबाबत अत्यंत जागरूक आणि आग्रही असलेल्या या अधिकाऱ्याला दुर्धर अशा कॅन्सरनं ग्रासलं होतं. मोठ्या-मोठ्या केसेस हिमतीनं आणि हिकमतीनं सोडवणारे हिमांशू रॉय या आजाराशीही दोन हात करत होते. पण शरीर साथ देत नव्हतं. त्यामुळे मनानं ते खचून गेले होते. या नैराश्याच्या भरातच त्यांनी जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला.  

कुलाबा येथील निवासस्थानी हिमांशू रॉय यांनी डोक्यात गोळी झाडून घेतली. हे वृत्त वेगानं पसरलं आणि सगळ्यांनाच धक्का बसला. त्यांना तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.  

कर्तव्यनिष्ठ आणि जिगरबाज अधिकारी अशी ओळख असलेले हिमांशू रॉय हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. महाराष्ट्र पोलीस दलात त्यांनी आपल्या धडाकेबाज कामगिरीनं स्वतंत्र ठसा उमटवला होता. आयपीएल स्पॉट फिक्सिंग, पत्रकार जे डे हत्या प्रकरण, लैला खान प्रकरण यासारख्या अनेक हायप्रोफाइल केसेस सोडवण्यात त्यांची भूमिका मोठी होती. २६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ला खटल्यातील दोषी अजमल कसाबच्या फाशीबाबत त्यांनी कमालीची गुप्तता पाळली होती. त्याबद्दल त्यांना सगळ्यांनीच दाद दिली होती.

>> 1995 मध्ये नाशिक (ग्रामीण) पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होते...>> अहमदनगर पोलीस अधीक्षकपदाची जबाबदारी सांभाळली...>> नाशिकच्या आर्थिक गुन्हे विभागात पोलीस उपायुक्त... >> 2009 साली मुंबईत पोलीस सहआयुक्त पदावर काम केलं.... >> सायबर सेलमध्येही प्रमुख जबाबदारी.>> महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख होते.>> राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक.

टॅग्स :हिमांशू रॉयपोलिस