अंगडिया वसुली प्रकरण: मध्यस्थामार्फत पाठवले लखनऊला सहा लाख; आणखी एक साक्षीदार समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 09:47 AM2022-03-22T09:47:56+5:302022-03-22T09:49:30+5:30

पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठींच्या घरी काम करणाऱ्या नोकर पप्पूकुमार प्यारेलाल गौडला अटक

IPS officer linked to angadia extortion sent Rs 6 lakh to lucknow | अंगडिया वसुली प्रकरण: मध्यस्थामार्फत पाठवले लखनऊला सहा लाख; आणखी एक साक्षीदार समोर

अंगडिया वसुली प्रकरण: मध्यस्थामार्फत पाठवले लखनऊला सहा लाख; आणखी एक साक्षीदार समोर

googlenewsNext

मुंबई : अंगडिया वसुली प्रकरणात पसार असलेल्या पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठींच्या घरी काम करणाऱ्या नोकर पप्पूकुमार प्यारेलाल गौड (२७) याला गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्या चौकशीतून पैशांच्या व्यवहारात मध्यस्थी करणारा आणखीन एक जण समोर आला आहे. त्याच्यामार्फत ६ लाख रुपये लखनऊला पाठवण्यात आले होते.

पैशांची बॅग घेऊन निघालेल्या अंगडियांना आयकर विभागाची भीती घालून वसुली करणाऱ्या एल टी मार्ग पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक (गुन्हे) ओम वंगाटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कदम, पोलीस उपनिरीक्षक समाधान जमदाडे यांच्या विरोधात १९ फेब्रुवारी रोजी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढील तपासासाठी हा गुन्हा सीआययूकडे वर्ग करण्यात आला. या प्रकरणात कदम आणि जमदाडे यांना अटक करण्यात आली. त्यापाठोपाठ पोलीस निरीक्षक ओम वंगाटेलाही अटक करण्यात आली. याच प्रकरणात त्रिपाठीचा शोध सुरु आहे. 

त्रिपाठींचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज
अटकेच्या भीतीने त्रिपाठींनी ॲड. अनिकेत निकम यांच्या मार्फत अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. यावर २४ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. डिसेंबर महिन्यात पोलिसांनी अंगाडियांकडून बेकायदेशीररित्या वसुली केलेल्या रकमेतील १९ लाख रुपये त्रिपाठींच्या जवळच्या व्यक्ती असलेल्या गौड याला हवाला मार्फत पाठविण्यात आले. 
वंगाटेने ही रक्कम पाठविल्याची कबुली दिली होती. तसेच, याची एक पावती गुन्हे शाखेला सापडली. त्याआधारे गुन्हे शाखेने गौड याचा शोध घेत उत्तरप्रदेश येथून अटक केली आहे. त्रिपाठींच्या सांगण्यावरुन आपण १९ लाख स्वीकारल्याची कबुली त्याने पोलिसांना दिल्याची माहिती मिळते आहे. 
त्याच्या चौकशीतून आणखीन एकाचा सहभाग समोर आला आहे. त्याच्यामार्फत ६ लाख रुपये त्रिपाठीसाठी लखनऊला पाठवण्यात आले होते. त्याचा जबाब नोंदवून गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. त्याच्याकडून दीड लाखांची रोकडदेखील जप्त करण्यात आली आहे.

Web Title: IPS officer linked to angadia extortion sent Rs 6 lakh to lucknow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.