मुंबई - राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांची बदली होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची महाराष्ट्राच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) पदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विवेक फणसाळकर ठाण्याचे पोलीस आयुक्त होण्याची शक्यता आहे. तर सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी बदली झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
(एसपींची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी सातारकरांचे धरणे आंदोलन)
जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची बदली रद्द करावी, या मागणीसाठी रविवारी (29 जुलै) सकाळी अकराच्या दरम्यान पोलीस मुख्यालयासमोर सातारकरांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, नागपूरचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची नियुक्ती होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्याचप्रमाणे येथील पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची पुण्याचे आयुक्त म्हणून बदली झाल्याचे वृत्त आहे. मात्र, अद्याप याबाबत अधिकृतरित्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही. उपाध्याय यांना नागपूरचा दांडगा अनुभव आहे. ते काही काळ नागपूर शहर वाहतूक विभागाचे उपायुक्त आणि नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राहिलेले आहेत.