- डिप्पी वांकाणी, मुंबई
राष्ट्रीय तपास संस्थेतील (एनआयए) प्रतिनियुक्तीची चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र केडरचे २००० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी डॉ. सुहास वारके हे राज्यात परतणार आहेत. यासंदर्भात बोलताना डॉ. वारके म्हणाले की, मी २०१२ पासून एनआयएमध्ये प्रतिनियुक्तीवर होतो. राष्ट्रीय तपास संस्थेमधील माझी चार वर्षांची प्रतिनियुक्ती संपली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा परतण्यासाठी मी सरकारला विचारणा केली आहे. मी सध्या राज्यात नियुक्तीसाठी प्रतीक्षेत आहे. डॉ. वारके यांची एनआयएमध्ये मार्च २०१५ पासून बढतीवर पोलीस उपमहानिरीक्षक दर्जाच्या पदावर सध्या नियुक्ती आहे. उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना आॅगस्टमध्येच राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आलेले आहे. दरम्यान, मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास संथ करण्यास आपणास सांगण्यात आल्याचा आरोप विशेष सरकारी वकील सॅलियन यांनी केल्याने एकच खळबळ उडाली होती. सॅलियन यांनी शपथपत्रात ज्या अधिकाऱ्याचे नाव दिले होते, ते डॉ. वारके यांचेच होते, असे सांगितले जाते.