बढत्या रेंगाळल्याने आयपीएस अस्वस्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 02:21 AM2018-05-21T02:21:33+5:302018-05-21T02:21:33+5:30
गृह विभागाचे दुर्लक्ष : पोलीस वर्तुळात नाराजीचे वातावरण
मुंबई : मे महिन्याचा अखेरचा आठवडा आला तरी पोलीस दलातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, बढत्यांना ‘मुहूर्त’ मिळालेला नाही. त्याचप्रमाणे उपनिरीक्षकापासून ते साहाय्यक आयुक्तांच्या सर्वसाधारण बदल्या (जीटी) काढण्यात न आल्याने खात्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. एडीजी, आयजी व डीआयजीच्या पदोन्नतीसाठी जवळपास २२ अधिकारी सेवा ज्येष्ठतेच्या आधारे गेले सहा महिने ते एक वर्षापासून पात्र असूनही त्यांचे प्रमोशन रेंगाळत ठेवले आहे. एकीकडे अनेक जागा रिक्त असताना गृह विभागाकडून होणाºया या दुर्लक्षाबाबत त्यांच्यातून नाराजी व्यक्त होत आहे.
खात्याच्या शिस्तीचा भाग म्हणून हे अधिकारी उघडपणे आपल्या भावना व्यक्त करीत नसले तरी कार्यालयातील रोजचा दिवस कसा तरी ‘भरून’ काढणे, इथपर्यंत मर्यादित ठेवले आहे. आता ३१ मेपूर्वी सर्वसाधारण बदल्या (जीटी) होणे अपेक्षित आहे. त्यात राज्यातील किमान ४० आयपीएस अधिकाºयांच्या बदल्या अपेक्षित आहेत. दरम्यान, या कामासाठी होत असलेल्या विलंबाबत गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
मुख्यमंत्र्यांचे ‘सबुरी’ धोरण
एकीकडे सनदी अधिकाºयांच्या बदल्या व बढत्या नियमितपणे होत असताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या अखत्यारीतील गृह विभागातील वरिष्ठ आयपीएसच्या बढत्या व बदल्यांबाबत बाळगलेल्या सबुरीच्या धोरणामुळे अधिकारी अस्वस्थ आहेत. विशेषत: मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई पोलीस आयुक्तासह विविध महत्त्वाच्या पदावरील अधिकारी दोन वर्षांहून अधिक कार्यकाळ पूर्ण होऊनही त्या ठिकाणी ठाण मांडून आहेत. अप्पर महासंचालकांची तब्बल सहा पदे रिक्त असतानाही त्याचा अतिरिक्त कार्यभार अन्य अधिकाºयांकडून चालविला जात आहे.
गृह सचिव कामावर रूजू पण...
आयपीएस अधिकाºयांच्या बढती व बदल्यांसाठी आवश्यक असलेली गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली आस्थापना समितीची बैठक होणे आवश्यक आहे. त्यांची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून त्याला अंतिम मंजुरी दिली जाते. मात्र ही बैठक झालेली नाही. सेवा ज्येष्ठतेच्या आधारावर मुख्य सचिव पदापासून डावलले गेल्याने काहीसे नाराज असलेले गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव हे दोन आठवड्यांच्या रजेवर गेले होते. ते पुन्हा कामावर रुजू झाले असले तरी त्यांची नाराजी कमी झालेली नाही. त्यामुळे त्यांना निवृत्तीनंतर एखाद्या पदावर नियुक्ती करण्याचे आश्वासन देऊन नाराजी दूर केली जाईल, अशी चर्चा मंत्रालयात सुरू आहे.
निवडणुकांमुळे पोस्टिंग निर्णायक
यंदाच्या आयपीएस अधिकाºयांच्या बदल्यांना विशेष महत्त्व आहे. कारण या वेळी होणाºया बदल्यांतील अधिकारीच पुढील वर्षी होणाºया लोकसभा, विधानसभा निवडणुकीवेळी संबंधित कार्यक्षेत्राचे प्रमुख राहतील. त्यामुळे निवडणूक कालावधीत सोयीच्या ठरणाºया अधिकाºयांची निवड करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारचा प्रयत्न राहील, याच कारणामुळे बदल्या, बढत्यांबाबत वेळ होत असल्याची चर्चा वरिष्ठ अधिकाºयांत सुरू आहे.
हजारांवर अधिकाºयांची जीटी कधी?
आयपीएस अधिकाºयांप्रमाणेच उपनिरीक्षक ते अप्पर अधीक्षक दर्जाच्या अधिकाºयांच्या सर्वसाधारण बदल्या (जीटी) झालेल्या नाहीत. या वर्षीसुमारे हजार ते बाराशे अधिकाºयांच्या बदल्या होणार आहेत. या आठवड्यात त्या केल्या जाणार आहेत. वास्तविक बदलीधीन अधिकाºयांच्या पाल्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होता कामा नये, यासाठी एप्रिलमध्ये बदल्यांचे आदेश जारी करून ३१ मेपर्यंत ते नवनियुक्तीच्या ठिकाणी रूजू व्हावेत, असे संकेत आहेत. मात्र त्याकडेही दुर्लक्ष झाले आहे.