ड्रग्ज माफिया कनेक्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेण्यासाठी ठाणे न्यायालयाने एनसीबीला गुरुवारी मंजुरी दिली. मात्र त्याबाबतच्या आदेशाची प्रत उशिरा मिळाल्याने त्याला गुरुवारी (२५ जून) कारागृहातून मुंबईला आणण्यात आले नाही. शुक्रवारी त्याला दक्षिण मुंबईतील कार्यालयात आणून चौकशी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुंबईतील ड्रग्ज तस्करीमध्ये कासकरचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याने एनसीबीने बुधवारी त्याला कागदोपत्री अटक केली. गुरुवारी ठाणे न्यायालयाने त्याचा ताबा देण्याच्या अर्जाला मान्यता दिली. मात्र या आदेशाची प्रत मिळेपर्यंत सायंकाळ उलटून गेली. त्यामुळे जेलच्या नियमावलीनुसार सायंकाळी पाचनंतर कैद्याला बाहेर सोडण्यास निर्बंध असल्याने त्याला मुंबईतील एनसीबीच्या कार्यालयात नेता आले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
इक्बाल कासकर हा गेल्या तीन वर्षांपासून विविध गुन्ह्यात विविध तपास यंत्रणेच्या ताब्यात आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो मनी लाॅंन्ड्रींगच्या गुन्ह्यात सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) न्यायायलयीन कोठडीत आहे. ठाण्यातील जेलमध्ये त्याला ठेवले होते. काश्मीर येथून मोठ्या प्रमाणात हशीश मुंबईत आणून विक्री करणाऱ्या रॅकेटवर एनसीबीने कारवाई केली होती. त्यातील तस्कर इक्बालशी संबंधित निघाल्याने एनसीबीने त्याच्यावरही गुन्हा दाखल करीत अटक केली. त्यानंतर अडीच महिन्यांपूर्वी दक्षिण मुंबईत डोंगरी येथील ड्रग्जचे रॅकेट उघडकीस आणण्यात आले होते. त्यातील आरोपीही इक्बाल व डी. गॅंगच्या संपर्कात असल्याची माहिती एनसीबीला मिळाली आहे.
..............................................