इक्बाल मिर्ची पीएमएलए केस : दोघांचा जामीन मंजूर, तर दोघांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2019 01:15 AM2019-12-01T01:15:41+5:302019-12-01T01:15:51+5:30
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) या सर्वांच्या जामीन अर्जावर आक्षेप घेतला.
मुंबई : इक्बाल मिर्ची मनी लॉड्रिंग केसमध्ये आरोपी असलेले हरुन युसूफ आणि हुमायून मर्चंट या दोघांनी मिर्चीला मदत केली, असे म्हणत विशेष न्यायालयाने या दोघांची जामिनावर सुटका करण्यास नकार दिला. याच केसमधील आरोपी रणजीत बिंद्रा व रिंकू देशपांडे यांचा जामीन न्यायालयाने मंजूर केला. बिंद्रा हा दलाल असून, मिर्चीच्या संपत्ती तोच विकायचा आणि त्याला त्याची दलाली रिंकू देशपांडेद्वारे मिळत होती.
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) या सर्वांच्या जामीन अर्जावर आक्षेप घेतला. ही केस संवेदनशील असून सर्व पैसे संघटित गुन्ह्याद्वारे कमाविण्यात आलेले आहेत. या पैशाचा वापर दहशतवादी कारवायांसाठी आणि नार्कोटिक्सच्या व्यापाराकरिता केला जात असावा. याबाबत तपास सुरू आहे, असे ईडीने न्यायालयाला सांगितले.
याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटणार आहेत, असा दावा ईडीने केला.
मिर्चीच्या बेकायदेशीर मालमत्तेसंदर्भात तपास करत असताना ईडीने चार जणांना पीएमएलए कायद्यांतर्गत ताब्यात घेतले. १९८६मध्ये मिर्चीने वरळी येथील सर मोहम्मद ट्रस्टच्या तीन ठिकाणांची संपत्ती रॉकसाइट एन्टप्राइजेसद्वारे खरेदी केल्या. या मालमत्तेच्या खरेदीविषयी ईडीने चौकशी सुरू केली आहे.
इक्बाल मिर्चीचा २०१३ मध्ये लंडन येथे मृत्यू झाला. मिर्ची हा दाऊद इब्राहिमचा खास होता.