BMC तून बदलीनंतर इक्बालसिंह चहल यांची मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त सचिवपदी नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 05:12 PM2024-03-22T17:12:57+5:302024-03-22T17:14:22+5:30
मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त पदावरुन बदलीनंतर इक्बालसिंह चहल यांची आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अतिरिक्त सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई-
मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त पदावरुन बदलीनंतर इक्बालसिंह चहल यांची आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अतिरिक्त सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार तीन वर्षांपेक्षा एका पदावर, जिल्ह्यात किंवा मूळ गाव असलेल्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या निवडणुकीच्या कामाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे सर्वसाधारण आदेश आयोगाने दिले होते. या आदेशानुसार इक्बालसिंह चहल, अश्विनी भिडे आणि पी.वेलारासू यांची बदली करणं बंधनकारक झालं.
मुंबई मनपाच्या आयुक्तपदी नुकतंच मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त आयुक्तपदी काम केलेल्या भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आज इक्बालसिंह चहल यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. इक्बालसिंह चहल यांनी मुंबईच्या आयुक्तपदी काम करताना राजकीय स्थित्यंतरे अनुभवली आहेत. तसंच दोन्ही वेळच्या सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेणारे अधिकारी म्हणूनही ते ओळखले गेले. आता चहल यांच्याकडे मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.