इक्बाल सिंह चहल, अश्विनी भिडे यांना मुंबई महापालिका सोडावी लागणार?; बदली अटळ! कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 01:26 PM2024-02-28T13:26:02+5:302024-02-28T13:27:17+5:30
मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्यासह काही अधिकाऱ्यांची बदली होणं आता अटळ मानलं जात आहे.
मुंबई-
मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्यासह काही अधिकाऱ्यांची बदली होणं आता अटळ मानलं जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं ज्या अधिकाऱ्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे त्यांची बदली करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारनं चहल आणि भिडे यांना या नियमातून वगळावं अशी विनंती निवडणूक आयोगाकडे केली होती. पण निवडणूक आयोगानं राज्य सरकारनं केलेली मागणी फेटाळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे इक्बाल सिंह चहल आणि अश्विनी भिडे यांची बदली निश्चित मानली जात आहे.
मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांची मुंबई महापालिकेत ३१ मे २०२४ रोजी चार वर्ष पूर्ण होतील. दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि पी. वेलारसू यांची देखील तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या नियमानुसार आता या तिनही अधिकाऱ्यांची बदली करणं राज्य सरकारला अनिवार्य बनलं आहे.
राज्य सरकारनं २६ फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहून अधिकाऱ्यांच्या बदल्यासंदर्भातील निकषातून मुंबई महापालिका आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त यांना वगळण्याची विनंती केली होती. हे अधिकारी थेट निवडणुकीच्या कामाशी संबंधित नाहीत. ते अधिकारी पायाभूत सोयी सुविधांच्या प्रकल्पांशी संबंधित असून ते मान्सूनच्या पूर्वतयारीच्या कामांशी निगडित असल्याचं राज्य सरकारचं म्हणणं होतं. पण निवडणूक आयोगानं थेट नियमावर बोट ठेवत राज्याची विनंती फेटाळून लावली आहे.