आयआरसीटीसीद्वारे १ लाख ७० हजार जणांना अन्नदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 05:27 PM2020-04-11T17:27:28+5:302020-04-11T17:27:58+5:30
गरजू व्यक्तींना इंडियन रेल्वे कॅटरिंग अँन्ड कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी ) द्वारे अन्नदान केले जाते.
मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळेरेल्वे सेवा बंद केली आहे. अचानक रेल्वे सेवा बंद झाल्याने बाहेर गावी जाणाऱ्याचे हाल झाले. हे प्रवासी आता स्थानकात थांबले आहेत. हॉटेल, स्टॉल बंद असल्याने यांचे खाण्याचे हाल झाले होते. लॉकडाऊनमुळे अनेक लोक एका ठिकाणी अडकून पडले. अशा नागरिकांना आणि गरजू व्यक्तींना इंडियन रेल्वे कॅटरिंग अँन्ड कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी ) द्वारे अन्नदान केले जाते. मुंबई, पुणे, भुसावळ, अहमदाबाद व इतर विभागात २९ मार्चपासून ते ११ एप्रिलपर्यंत १ लाख ७० हजार जणांना अन्नदान केले आहे.
लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी येऊ नयेत, त्यांच्या मदतीसाठी आयआरसीटीसी, आरपीएफ, वाणिज्यिक विभागाच्या कर्मचारी आणि सामाजिक संस्था यांनी पुढाकार घेतला आहे. यांच्यावतीने देशभरातील विविध रेल्वे स्थानकावर गरजू व्यक्तींना अन्नदान केले जात आहे. ११ एप्रिल रोजी पश्चिम आणि मध्य रेल्वेतील विभागात अडकून पडलेल्या ७ हजार ९०० जणांना अन्नदान केले.
पश्चिम रेलवे के मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले की, आयआरसीटीसी आणि पश्चिम रेल्वे कोरोनाशी सामना करत आहेत. या कठीण काळात गरजूना मदत केली जात आहे. १० एप्रिल रोजी मुंबई सेंट्रल येथे सुमारे ६ हजार जणांना अन्नदान केले. अहमदाबाद येथे ६ हजार ७०० अन्नाची पाकिटे देण्यात आली. आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, २९ मार्चपासून येथे आयआरसीटीसीच्या मुंबई सेंट्रल बेस किचन आणि अहमदाबाद बेस किचन अन्नदान केले जात आहे. देशासह संपूर्ण जगात करोना विषाणूचा प्रसार वाढला आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन घोषित केले आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र या कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका देशासह राज्यातील बेघर आणि रस्त्यावर राहणाऱ्या नागरिकांना बसत आहे. त्यामुळे त्यांना अन्नदान करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.