मुंबई : विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीए) या नियामक मंडळाने, मालवाहतूकदारांवर आकारलेल्या विम्याच्या टक्केवारीत कपात करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत यासंदर्भात झालेल्या चर्चेनंतर शनिवारी मालवाहतूकदारांच्या कोअर कमिटीचे अध्यक्ष बाल मल्कीत सिंग यांनी हैदराबाद येथे प्राधिकरणाचे सदस्य पी. जे. जोसेफ यांच्याशी चर्चा केली. या संदर्भातील अंतिम निर्णय सोमवारी प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुभाष खुंटीआ यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत होणार असल्याचे सिंग यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.गेल्या दोन वर्षांत मालवाहतूक वाहनांच्या थर्ड पार्टी प्रीमियममध्ये सुमारे ७० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दरवर्षी ही वाढ१५ टक्क्यांपुरती मर्यादित ठेवण्यावर शनिवारी चर्चा झाली. या सकारात्मक चर्चेनंतर सोमवारी पुढील चर्चा ही अध्यक्षांसोबत होईल. त्यामुळे या बैठकीनंतरच यासंदर्भातील सविस्तर माहिती सर्व मालवाहतूकदारांना देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.सध्या मालवाहतूक गाड्यांचे वजन (जीव्हीडब्ल्यू) ७ हजार ५०० ते २० हजार मेट्रिक टन आणि २० हजार ते ४० हजार मेट्रिक टनापर्यंत आहे. प्रत्येक गाडीमागे हजारो रुपयांची लूट सुरू आहे. मोठ्या कंपन्यांकडून वसूल होणारी ही रक्कम लाख आणि कोट्यवधींच्या घरात आहे. त्यामुळे प्रीमियम वाढीची टक्केवारी १५ टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आल्यास, मालवाहतूकदारांचे कोट्यवधी रुपये वाचणार आहेत. त्यामुळे त्यांना दिलासा मिळणार आहे. हा संघटनेचा मोठा विजय ठरेल, अशी प्रतिक्रिया बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष अशोक राजगुरू यांनी दिली.
आयआरडीएस प्रीमियम कमी होणार; मालवाहतूकदारांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 1:49 AM