मुंब्रा ते शिवतीर्थ! राज ठाकरेंच्या मनसेचा मुस्लीम पदाधिकारी का काढतोय पदयात्रा?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 05:02 PM2023-11-22T17:02:10+5:302023-11-22T17:03:02+5:30
राज ठाकरेंचा मी मनापासून चाहता आहे. माझ्यासाठी ते आई वडिलांच्या जागी आहेत असं या पदाधिकाऱ्याने म्हटलं.
मुंब्रा - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षानं २ वर्षापूर्वी भोंग्याच्या प्रकरणावरून तत्कालीन मविआ सरकारला इशारा दिला होता. राज ठाकरेंच्या या कट्टर हिंदुत्ववादी भूमिकेमुळे पक्षातील अनेक मुस्लीम पदाधिकारी नाराज झाले होते. परंतु आजही राज ठाकरेंना मानणारे अनेक मुस्लीम पदाधिकारी मनसे पक्षात सक्रीय कार्यरत आहेत. त्यातच मुंब्रा येथील एक मुस्लीम पदाधिकारी इरफान सय्यद यांनी मुंब्रा ते राज ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थपर्यंत पायी चालत जाण्याचा निर्धार केला आहे.
मुंब्र्यात नेहमीच मनसेची बाजू मांडणारे इरफान सय्यद यांनी शहरातील सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामांविरोधात आवाज उचलला आहे. मुंब्रा कळवा परिसरात होणारी बेकायदेशीर बांधकामे, कांदळवनाची नष्ट करण्यात येणारी खाडी किनारी झाडे. हॉकर्स झोनच्या नावाखाली अमृत नगर इथं होत असलेली वाहतूक कोंडी आणि विकासाच्या नावाखाली होणारा भ्रष्टाचार यावर इरफान सय्यद यांनी आवाज उचलला. सातत्याने मनसेकडून पत्र व्यवहार केले. परंतु प्रशासनाकडून कुठलीच दखल घेतली जात नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
प्रशासनाच्या कारभाराला वैतागलेले इरफान सय्यद यांनी मुंब्रा ते शिवतीर्थ पायी जाण्याचा निर्णय घेतला. डोक्यावर टोपी, छातीवर राज ठाकरेंचा फोटो आणि हातात मनसेचा झेंडा घेऊन इरफान सय्यद हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत.याबाबत इरफान सय्यद म्हणाले की, मी कळवा मुंब्रा येथील जिल्हा संघटक असून वाहतूक सेनेचा पदाधिकारी आहे. राज ठाकरेंचा मी मनापासून चाहता आहे. माझ्यासाठी ते आई वडिलांच्या जागी आहेत. त्यामुळे मुंब्रा येथे होणारा भ्रष्टाचार, अतिक्रमण याविरोधात निवेदन देण्यासाठी मी मुंब्रा येथून पायी चालत राज ठाकरेंच्या निवासस्थानी जात आहे. आपण यात लक्ष घालावे अशी मागणी राज ठाकरेंना भेटून करणार असल्याचे सय्यद यांनी सांगितले.
दरम्यान, अलीकडेच मुंब्रा येथे शिवसेना शाखा बुलडोझरनं पाडल्यामुळे शिवसेनेचे दोन्ही गट आमनेसामने आले होते. उद्धव ठाकरे स्वत: मुंब्रा येथे गेले होते. परंतु शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना काळे झेंडे दाखवले. मुंब्र्यात शिवसेनेची शाखा पाडून त्याठिकाणी कंटेनरमध्ये शिंदे गटाने शाखा उघडली. त्या शाखेवर ठाकरे-शिंदे गटाने दावा सांगितला आहे. तर आमची शाखा बेकायदेशीरपणे पाडण्यात आली असा आरोप ठाकरे गटाने केला आहे.