मुंबई : मुंबईत मेट्रो २ अ प्रकल्पाच्या मालाड लिंक रोडजवळ सुरू असणाऱ्या पुलाच्या कामादरम्यान पुलाचा लोखंडी सांगाडा कोसळला. गुरुवारी दुपारी २ वाजताच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.मुंबईत सध्या मेट्रो प्रकल्पांची कामे जोरात सुरू आहेत. त्यातील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा प्रकल्प म्हणजे ‘मेट्रो २ अ’ प्रकल्प. मुंबईतील दहिसर पश्चिम ते अंधेरीतील डी.एन. नगरपर्यंत मेट्रो २ अ प्रकल्पाचा मार्ग आहे. या मार्गावरील मालाड लिंक रोडजवळ सुरू असलेल्या पुलाच्या कामादरम्यान गुरुवारी दुपारच्या सुमारास पुलाचा लोखंडी सांगाडा कोसळला. मात्र, या साइटवर काम करणारे सर्व कामगार सुखरूप आहेत. या दुर्घटनेमुळे लिंक रोडवरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. रस्त्यावर कोसळलेल्या लोखंडी सांगाड्याला दूर केल्यानंतर थोड्या वेळातच वाहतूक पूर्ववत सुरू झाली.एमएमआरडीएच्या अधिकाºयांनी दुर्घटना घडल्यानंतर तत्काळ मालाड लिंक रोडवरील साइटला भेट देऊन झालेल्या घटनेची माहिती घेतली. मेट्रो-२ अ, मेट्रो-२ ब या प्रकल्पांची कामे सध्या या भागात सुरू आहेत. पावसाळ्यापूर्वी या प्रकल्पातील किमान ५० टक्के काम पूर्ण करण्याचे एमएमआरडीएने ठरवले आहे. सुरक्षेची योग्य ती काळजी घेण्यात येत असून या दुर्घटनेमुळे या प्रकल्पाच्या आगामी कामात कोणताही अडथळा येणार नसल्याचे एमएमआरडीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Mumbai Metro : पुलाचा लोखंडी सांगाडा कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 6:02 AM