मुंबई - भरधाव वेगाने जात असलेल्या ओमनी व्हॅन चालकाने सायन येथील षण्मुखानंद चॅरिटेबल कम्युनिटी रुग्णालयाच्या लोखंडी प्रवेशद्वाराला धडक दिल्याने घडलेल्या दुर्घटनेत डॉ. मेघाली भट्टाचार्यजी या नेत्रतज्ज्ञ महिलेचा मृत्यू झाला.
डॉ. मेघाली यांची आई बीबा भटाचार्यजी (७८) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून सायन पोलिसांनी आरोपी मोटारचालक सुरेश बोगटी (३२) याला अटक केली आहे. त्याचे रक्तनमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. डोळ्यांची तपासणी करण्यासाठी बीबा आणि त्यांची बहीण सुब्रा शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास डॉ. मेघाली यांच्याकडे षण्मुखानंद चॅरिटेबल कम्युनिटी रुग्णालयात गेल्या होत्या. दुपारी ४.३०च्या सुमारास डॉ. मेघाली, बीबा आणि सुब्रा रुग्णालयातून घरी जाण्यासाठी बाहेर पडल्या. त्यांनी घरी जाण्यासाठी कॅब बुक केली होती. रुग्णालयाच्या लोखंडी प्रवेशद्वारामागे उभ्या राहून तिघीही कॅबची वाट बघत होत्या. यावेळी भरधाव वेगाने आलेली एक ओमनी मोटार रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर धडकली. या भीषण अपघातात लोखंडी प्रवेशद्वार तुटून तिघींच्या अंगावर कोसळले.
पोलिसांनी बीबा यांच्या तक्रारीवरून आरोपी चालक बोगटी विरोधात निष्काळजीपणे भरधाव वेगाने वाहन चालवून डॉ. मेघाली यांच्या मृत्यूस त्याचबरोबर बीबा आणि सुब्रा यांना जखमी करण्यास कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंदवला आणि त्याला अटक केली.