Join us

जीवाची पर्वा न करता कुणाल अन् सतीशने राखली तिरंग्याची शान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 3:28 AM

इमारतीच्या नवव्या मजल्यावर लागलेली आग क्षणार्धात दहाव्या मजल्यापर्यंत पसरत गेली.

मुंबई : माझगाव येथील वस्तू व सेवा कर (राज्यकर) आयुक्त कार्यालयाला सोमवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत कुणाल जाधव, सतीश शिंदे या कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावून छताच्या दिशेने धाव घेतली व छतावर डौलाने फडकत असलेला तिरंगा सन्मानाने खाली उतरवीत त्याची शान राखली.

इमारतीच्या नवव्या मजल्यावर लागलेली आग क्षणार्धात दहाव्या मजल्यापर्यंत पसरत गेली. जीव वाचविण्यासाठी सर्व कर्मचारी, अधिकारी इमारतीबाहेर येण्याची धावपळ करत असतानाच कुणाल जाधव यांनी तळमजल्यावरून वर जात छतावर जाऊन तिथे फडकत असलेला तिरंगा सन्मानाने काढला व त्याला खाली घेऊन आले. यासाठी त्यांना सतीश शिंदे यांची साथ मिळाली. जीएसटी इमारतीत शिपाई म्हणून काम करत असलेले जाधव म्हणाले की, तळमजल्यावर स्टेशनरी विभागात काम करत असताना आगीची माहिती मिळाली. त्याचवेळी मला छतावर फडकत असलेल्या तिरंग्याचे स्मरण झाले. मी छताच्या दिशेने धाव घेतली. यापूर्वी मी जीएसटी भवनच्या झेंडा पथकामध्ये काम केले आहे. त्यामुळे झेंडा फडकाविणे व उतरविणे याबाबत मला माहिती होती. मी छतावर गेलो तेव्हा तिथे शिंदे व आणखी एक व्यक्ती उपस्थित होती. आम्ही तिघांनी झेंडा काढला व खाली घेऊन आलो.

कर्मचारी जीव वाचविण्यासाठी इमारतीबाहेर निघण्यासाठी जिन्यामधून बाहेर येत असताना दुसरीकडे जाधव यांनी मात्र जीवापेक्षा तिरंग्याला महत्त्व दिले. तिरंग्यावरील प्रेमापोटी उत्स्फूर्तपणे ही क्रिया घडल्याचे जाधव म्हणाले. तर कर्मचारी शिंदे यांनी सांगितले की, आगीत तिरंग्याचे नुकसान होऊ नये म्हणून तेथे गेलो. आम्हाला हे काम कोणी सांगितले नव्हते. मात्र तिरंग्याला नुकसान होऊ नये म्हणून स्वत:हून हे पाऊल उचलले.

टॅग्स :मुंबईआग