Irrfan Khan Passed away: हरहुन्नरी कलाकाराची एक्झिट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 06:19 AM2020-04-30T06:19:06+5:302020-04-30T06:19:15+5:30
इरफान खान यांचे पूर्ण नाव साहबजादे इरफान अली खान असे होते. त्यांच्या वडिलांचा टायरचा व्यवसाय होता.
मुंबई : इरफान खान, बॉलिवूडमधील एक हरहुन्नरी कलाकार. विविध चित्रपटात त्यांनी साकारलेल्या कसदार भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून गेल्या. यासोबतच कॅन्सरशी झुंज देऊन नव्याने त्यांनी चित्रपटसृष्टीत घेतलेली इंट्री आणि अचानक जगातूनच घेतलेली एक्झिट रसिक प्रेक्षकांना चटका लावणारी अशीच आहे. त्यांच्या आठवणींना उजाळा देत मान्यवरांनी त्यांना वाहिलेली शब्दपुष्प...
>अल्प परिचय
जन्म ७ जानेवारी १९६७ जयपूर येथे इरफान खान हे केवळ उत्तम अभिनेतेच नव्हते तर, बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील सर्वात सक्षम अभिनेते अशी त्यांची ओळख होती. अर्थात गुणवत्ता आणि क्षमता असूनही या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना बरीच मेहनत करावी लागली. बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसर उमटवणाऱ्या इरफान खान यांचा आयुष्याचा संघर्ष फार मोठा होता. एका मुस्लीम पठाण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. इरफान खान यांचे पूर्ण नाव साहबजादे इरफान अली खान असे होते. त्यांच्या वडिलांचा टायरचा व्यवसाय होता.
जेव्हा त्यांना एनएसडीमध्ये प्रवेश मिळाला, त्याचदरम्यान त्यांच्या वडिलांचे निधन झाले. यानंतर त्यांना घरच्यांकडून पैसे मिळणे बंद झाले.
एनएसडीकडून मिळणाºया शिष्यवृत्तीवर त्यांनी कोर्स पूर्ण केला. इरफान खान यांनी त्यांच्या करिअरमध्ये एकाहून एक सरस सिनेमे दिले. बॉलिवूडप्रमाणे ते हॉलिवूडमध्येही सक्रिय होते. त्यांनी हॉलिवूडमधील ‘स्पाइडर मॅन’, ‘जुरासिक वर्ल्ड’ आणि ‘इन्फर्नो’ या चित्रपटांत काम केले. एका मुलाखतीत हॉलिवूड अभिनेता टॉम हँक्सने इरफानचे कौतुक करत म्हटले होते की, ‘इरफानचे डोळेही अभिनय करतात’.
इरफान खान यांनी २००५ मध्ये ‘रोग’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘हासिल’ या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट खलनायकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. ‘पान सिंह तोमर’ सिनेमासाठी इरफान यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. २०११ मध्ये भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.
इरफान खान यांनी त्यांची वर्ग मैत्रीण सुतपा सिकंदरशी १९९५ मध्ये लग्न केले. त्यांच्या अनेक वाईट दिवसांमध्ये सुतपा त्यांच्या पाठीशी खंबीर उभी राहिली.
>इरफान खान हे सामाजिक जाण असणारे प्रतिभावंत कलाकार होते. आपल्या सशक्त अष्टपैलू अभिनयामुळे त्यांनी अनेक चित्रपट तसेच मालिकांमधील संस्मरणीय भूमिका साकारल्या. त्यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपट सृष्टीचे नुकसान झाले आहे.
- भगतसिंह कोश्यारी,
राज्यपाल
>गुणी अभिनेते इरफान यांच्या निधनाची बातमी समजल्यावर खूप दु:ख झाले
- लता मंगेशकर, ज्येष्ठ गायिका
मी त्याला वैयक्तिकरित्या ओळखत नव्हते, परंतु आम्ही एकदा एका पुरस्कार सोहळ्यात भेटलो होतो. तिथे त्याने माझे स्वागत केले. यावेळी आम्ही संगीत या विषयावर गप्पा मारल्या. तो एक अद्भुत अभिनेता होता. त्याने भारत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोलाची कामगिरी केली.
- आशा भोसले, ज्येष्ठ गायिका
>धन्यवाद! न विसरता येणाºया सिनेमांच्या आठवणींबद्दल. धन्यवाद! कलाकार म्हणून तू अभिनयाचा दर्जा वाढवल्याबद्दल. धन्यवाद! सिनेसृष्टीला समृद्ध केल्याबद्दल. तुझी खूप खूप आठवण येत राहील, पण तू आमच्यात राहिल्याबदद्ल आम्ही कृतज्ञ आहोत. तुला सलाम!
- क रण जोहर, दिग्दर्शक
>इरफानचा चित्रपट म्हटला की, एका कसदार अभिनेत्याचे जणू विद्यापीठ होते. त्यामुळे त्याने साकारलेल्या प्रत्येक व्यक्तिरेखेतून त्याने ती पात्रे जिवंत केली. आज त्याच अभिनेत्याची मृत्यूशी सुरू असलेले झुंज संपली. गेल्या कित्येक दिवसांपासून कॅन्सरने ग्रस्त असणारा आणि कित्येकांच्या मनामनातला लाडका अभिनेता इरफान खान याने आज अखेरचा श्वास घेतला. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवणारा अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला.
- रितेश देशमुख, अभिनेता
>सहज अभिनयाची परंपरा हिंदी चित्रपटसृष्टीत इरफानने प्रवाहित ठेवली. इरफान लक्षात राहील कारण पडद्यावर तो वावरताना आपल्यातला प्रत्येक माणूस स्वत:ला त्याच्याशी एकरूप करू शकायचा. ही एकरूपताच इरफानला दीर्घकाळ स्मरणात ठेवेल. अशा या चतुरस्त्र अभिनेत्यास आणि सहकाºयास भावपूर्ण श्रद्धांजली.
- राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे
प्रिय इरफान इतक्या लवकर का गेलास? तू देशातला एक उत्कृष्ट अभिनेता होतास आणि सर्वात चांगला माणूस होतास. तू फक्त परिश्रम घेण्यावर विश्वास ठेवलास आणि पारंपारिक फिल्मी स्टारडमला नकार दिलास. तू अनेक प्रतिभावान कलाकारांना प्रेरित केलेस.
- वामन केंद्रे, नाट्य दिग्दर्शक
इरफान भाई तुम्हाला जवळून जाणून घेण्याची संधी कधी मिळाली नाही. असे वाटले होते की तुमचा एक प्रशंसक म्हणून तुमच्या सोबत एखादा चित्रपट करेन. खूप काही घेऊन गेलात आणि खूप काही देऊन गेलात.
- आयुषमान खुराना, अभिनेता
इरफान माझ्या आवडत्या कलाकरांपैकी एक होता. मी त्यांचे जवळपास सर्व चित्रपट पाहिले आहेत. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.
- सचिन तेंडुलकर, माजी क्रिकेटपटू
इरफान यांच्यात अतुलनीय प्रतिभा होती. त्यांच्या अष्टपैलू कामगिरीने प्रत्येकाच्या हृदयाला प्रेमाने स्पर्श केला. देव त्याच्या आत्म्यास शांती देवो.
- विराट कोहली, क्रिकेटपटू