मुंबई – बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांच्या परिचयाची गरज नाही. बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या अभियनाने इरफान खान यांनी काही वर्षात सुपरस्टार पर्यंत मजल मारली आहे. हरहुन्नरी कलाकार म्हणून इरफान खान नेहमी आपल्या वेगळेपणामुळे लोकांमध्ये चर्चेत असायचे. त्यामुळेच पठाण कुटुंबात असूनही ते पूर्णत: शाकाहारी होते.
इरफान खान यांचे पूर्ण नाव साहबजादे इरफान अली खान असं होतं. त्यांचा जन्म एका पठाण मुस्लीम कुटुंबात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव जागीरदार खान असे होते. त्यांचा टायरचा व्यवसाय होता. इरफान पठाण मुस्लीम कुटुंबात जन्माला येऊनही कधीही त्यांनी मासांहार केला नाही. ते लहानपणापासून शाकाहारी होते. याच कारणाने त्यांचे वडील मस्करीमध्ये इरफान खानला म्हणत की पठाण कुटुंबात एक ब्राह्मण जन्माला आला आहे.
वडील जागीरदार खान इरफानला शिकारीला सोबत घेऊन जात असे. जंगलातील वातावरण इरफान खानला नेहमी आवडायचे पण कोणत्याही मुक्या जनावराची शिकार करणे इरफानला मुळीच आवडत नसे. एका प्राण्याची हत्या केली तर त्याच्या कुटुंबाचं काय होणार? असा विचार इरफान खान करत होते. इरफान खान यांना रायफल चालवण्यास येत होती पण कधीही त्यांनी शिकार केली नाही.
एनएसडीमध्ये इरफान खान यांचा प्रवेश झाल्यानंतर काही काळातच त्यांचे वडील जागीरदार खान यांचे निधन झाले. त्यामुळे घरुन येणारे पैसेही बंद झाले. एनएसडीमध्ये मिळणाऱ्या स्कॉलरशिपवर इरफान यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. अशा संघर्षाच्या काळात इरफान खान यांच्या क्लासमेट सुतापा सिंकदर यांची त्यांना साथ दिली. २३ जानेवारी १९९५ मध्ये या दोघांनीही विवाह केला. इरफान खानने पीकू, लाइफ ऑफ पाई, द नेमसेक, स्लमडॉग मिलेनियर, पान सिंह तोमर, हासिल, लाइफ इन अ मेट्रो, तलवार, मकबूल, ये साली जिंदगी, हैदर सारख्या अनेक प्रसिद्ध चित्रपटात प्रमुख भूमिकेत काम केले.
हरहुन्नरी अभिनेता इरफान खानची अकाली 'एक्झिट'; बॉलिवूडला मोठा धक्का
बॉलिवूडचा असा दिग्गज अभिनेता इरफान खान याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. दीर्घकाळापासून कॅन्सरशी झुंज देत असलेल्या इरफानचे आज निधन झाले. मंगळवारी अचानक तब्येत बिघडल्यामुळे इरफानला कोकिलाबेन रुग्णालयात आयसीयूमध्ये भरती करण्यात आले होते. इरफान लवकर बरा व्हावा, यासाठी चाहते प्रार्थना करत असताना त्याच्या मृत्यूची बातमी आली आणि चाहते शोकसागरात बुडाले. बॉलिवूडमध्येही शोककळा पसरली.