आयआरएस अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात; ८६ टक्के अधिक मालमत्ता आढळली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2022 06:15 AM2022-10-08T06:15:39+5:302022-10-08T06:16:09+5:30
ज्ञात स्रोतापेक्षा ८६ टक्के अधिक मालमत्ता जमा करणाऱ्या आयकर विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला सीबीआयने अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: ज्ञात स्रोतापेक्षा ८६ टक्के अधिक मालमत्ता जमा करणाऱ्या आयकर विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला सीबीआयने अटक केली आहे. त्याच्याकडे ७ कोटी ५२ लाखांची मालमत्ता आढळली. विशेष म्हणजे, भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कमाविलेल्या पैशातून अधिकाऱ्याने तीन मजली इमारत बांधल्याचा ठपकादेखील सीबीआयने त्याच्यावर ठेवला आहे.
या प्रकरणात सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरनुसार, २००८ ते २०१८ या कालावधीमध्ये मोरादाबाद येथे आयकर विभागात विविध पदांवर कार्यरत असलेल्या अमित निगम या अधिकाऱ्याने अवैधरीत्या संपत्ती जमा केल्याचा आरोप आहे. ही मालमत्ता त्याच्या तसेच त्याच्या पत्नीच्या नावे असल्याचेही दिसून आले. या अधिकाऱ्याने रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्याचेही आढळले. यात दिल्ली फ्लॅट, लखनौचा फ्लॅट, भूखंड व लखनौ येथे ३ मजली इमारत यांचा समावेश आहे. यांची किंमत ८ कोटी १ लाख ६४ हजार रुपये आहे. या अधिकाऱ्याने बँकेकडून मोठ्या कर्जाची उचल आणि परतफेडही केली. उत्पन्न आणि मालमत्ता यासंदर्भात सुसूत्र माहिती न देता आल्यामुळे त्याच्यावर कारवाई केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"