IPL Auction: विकत जायला ती वस्तू आहे का? रहाणेचा फोटो शेअर करत शरद पोंक्षेंचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 12:54 PM2022-12-24T12:54:46+5:302022-12-24T12:58:32+5:30
शरद पोंक्षे हे आपल्या बिनधास्त आणि सडतोड मत व्यक्त करण्याबद्दल सर्वपरिचीत आहेत.
इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) च्या मिनी लिलावात सॅम कुरन ( Sam Curran) हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. कॅमेरून ग्रीन, बेन स्टोक्स व निकोलस पूरन यांच्यावरही पैशांचा पाऊस पडला. झिम्बाब्वेचा सिकंदर रजा, नामिबियाचा डेव्हिड विसे आणि आयर्लंडचा जोशुआ लिटल यांनी सर्वांना आश्चर्यचकित केले. आजच्या आयपीएल लिलावात २९ परदेशी खेळाडूंसह ८० जणांना करारबद्ध केले गेले आणि त्यासाठी १६७ कोटी रुपये मोजले गेले. या ८० खेळाडूंमध्ये १५ खेळाडू हे इंग्लंडचेच आहेत. टीम इंडियाचा कर्णधार राहिलेल्या अजिंक्य राहणेचा मात्र भाव घसरल्याचं दिसून आलं. मात्र, या लिलावासंदर्भातील बातम्या पाहून अभिनेते शरद पोंक्षेंनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
शरद पोंक्षे हे आपल्या बिनधास्त आणि सडतोड मत व्यक्त करण्याबद्दल सर्वपरिचीत आहेत. अनेकदा ते राजकीय रोष पत्करुनही आपली भूमिका ठामपणे मांडताना दिसतात. त्यावरुन, काहीवेळा त्यांना ट्रोलही करण्यात आलं आहे. तर, अभिनेता म्हणून त्यांनी सिनेसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या ते सोशल मीडियावरही सक्रीय असतात. शरद पोंक्षे यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी एका आयपीएल लिलावासंदर्भातील वृत्तांकनावरुन प्रसारमाध्यमांवर टीका केली आहे.
एका मराठी वृत्तवाहिनीने अजिंक्य रहाणेला चेन्नई सुपर किंग्ज या संघाने ५० लाखांना विकत घेतलं असे बातमी दिली होती. त्याचा स्क्रिनशॉट शेअर करत शरद पोंक्षेंनी संताप व्यक्त केला. विकत घ्यायला ती वस्तू आहे का? ही दळीद्री पत्रकारीता. त्या खेळाडूच ते मानधन आहे. ते अशा विकृत पध्दतीनं जाहीर करायला लाज कशी वाटत नाही?, असे त्यांनी आपल्या इंस्टा पोस्टमध्ये म्हटले आहे. शरद पोंक्षेंच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत, काहींनी त्यांचे समर्थन केले आहे. तर, काहींना त्यांच्या या टिकेला प्रत्युत्तरही दिलं आहे. मात्र, क्रिकेटच्या खेळाचं झालेलं व्यावसायिकरण यानिमित्ताने चर्चेत आले.
अजिंक्य रहाणेला ५० लाख रुपयांची बोली
आयपीएल 2023 च्या या लिलावात भारतीय संघातील खेळाडू अजिंक्य रहाणेकडेही सर्वांचं लक्ष लागलं होतं. सोशल मीडियावर रहाणेला कोणताच संघ घेणार नाही, अशी चर्चा रंगली होती. मात्र, चेन्नई सुपर किंग्जने त्याला आपल्या संघात घेतले आहे. अजिंक्य रहाणेला IPL 2022 सिझनसाठी कोलकाता नाइट राइडर्ससंघाने 1 कोटी रुपयांत विकत घेतले होते. मात्र, आयपीएल 2022 च्या 7 सामन्यांत त्याला केवळ 133 धावाच करता आल्या होत्या. आयपीएल 2022 मध्ये खराब प्रदर्शन केल्याने यावर्षी कोलकाता नाईट राइडर्सने त्याला रिलीज केले होते. आता आयपीएल 2023 सीझनच्या लिलावात रहाणेला चेन्नई सुपर किंग्सने 50 लाखांच्या बेस प्राईसमध्ये खरेदी केले आहे. अजिंक्य रहाणेची किंमत यंदाच्या लिलावात घसरल्याचं दिसून आलं.