लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज ठाकरे महाराष्ट्रद्रोह्यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील तर बाळासाहेबांच्या आत्म्याला किती यातना होत असतील, अशी टीका उद्धवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केल्याने मनसे नेते विरोधी संजय राऊत आमने-सामने आले आहेत.
महाराष्ट्रद्रोही अबू आझमींबरोबर युती केल्यामुळे वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकारांच्या आत्म्याला किती वेदना झाल्या असतील, तेव्हा लाज वाटली नाही का, असा सवाल मनसे नेत्यांकडून संजय राऊत यांना करण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदूंना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला मतदान करा असे आवाहन केले होते. यावरून संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर टीका केली.
काय म्हणाले संजय राऊत?
काही नेते आणि काही पक्ष यांची फार दखल घ्यावी, अशी महाराष्ट्राची स्थिती नाही. महाराष्ट्रात किंवा देशामध्ये सध्या संविधान वाचवण्याची फार मोठी लढाई सुरू आहे. या देशातील लोकशाही, स्वातंत्र्य आणि संविधान धोक्यात आलेले असताना, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, जैन, बौद्ध या देशातील सगळ्या जाती-धर्मांचे, पंथांचे लोक मतदानाच्या माध्यमातून सत्ता परिवर्तन करू इच्छित आहेत आणि त्याच वेळेला राज ठाकरे यांच्यासारखे नेते महाराष्ट्रद्रोही नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील. प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील, याची कल्पनाच न केलेली बरी, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
मनसे नेत्यांचे प्रत्युत्तर
२०१४ पासून २०१९ पर्यंत मोदींच्या आणि भाजपच्या मांडीवर, कडेवर बसून सत्तेची मौज लुटली. तेव्हा महाराष्ट्रद्रोही असल्याची लाज वाटली नाही का, आता मनसेने महायुतीला पाठिंबा दिला तर मनोरुग्ण राऊतांचा तिळपापड झाल्याचे दिसतंय. तुमचे उद्धव ठाकरे त्या ‘औरंग्याची औलाद’ अबू आझमीला कडेवर घेऊन नाचत आहेत याला महाराष्ट्रद्रोह म्हणत नाही का? त्यामुळे वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकारांच्या आत्म्याला किती वेदना झाल्या असतील, असा सवाल मनसे नेते गजानन काळे यांनी संजय राऊत यांना केला.