मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार कर्जत-जामखेडमध्ये एमआयडीसी सुरू होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्या एमआयडीसीला मिळणारी जमीन ही नीरव मोदीची असल्याचा दावा आमदार राम शिंदे यांनी विधान परिषदेत केल्याने खळबळ उडाली. त्यावर, ही जमीन फरार नीरव मोदी याची आहे का, याची सखोल चौकशी केली जाईल, असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले.
आ. राम शिंदे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. कर्जत तालुक्यात शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दरात गुंतवणूकदारांनी विकत घेतल्या आहेत. त्यांची नावे नीरव मोदी, मनीषा कासोले, नयन गणेश अग्रवाल, कमलेश शाह, पंकज विनोद खन्ना, गणेश अग्रवाल अशी आहेत. ही एमआयडीसी गुंतवणूकदार, की बेरोजगारांसाठी करायची, असेही ते म्हणाले.
त्यावर मंत्री सामंत म्हणाले की, कर्जतला एमआयडीसी करण्याबाबत आम्ही सकारात्मक हा नीरव मोदी लंडनला पळून गेलेला की स्थानिक आहे, याची माहिती घेतली जाईल. तसेच, सर्व नावांची चौकशी करू.
तीन महिन्यांत निर्णय
भूनिवड समितीने संबंधित जागेची पाहणी केली आहे. मात्र, जलसंपदा विभागाने इथे पाणीपुरवठा करण्याबाबत ठोस निर्णय घेतलेला नाही. आदी तांत्रिक बाबी तपासून येत्या तीन महिन्यांत निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले. या चर्चेत अरुण लाड, सत्यजित तांबे, सचिन अहीर, शशिकांत शिंदे यांनी सहभाग घेतला.