मुंबई : गेल्या काही वर्षांत मुलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. विशेष म्हणजे आरोग्य क्षेत्रात निर्माण झालेल्या जनजागृतीमुळे कॅन्सरचे निदान लवकर केले जात आहे. त्यामुळे उपचारही लवकर केले जात असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कॅन्सरचे विविध प्रकार आहेत. त्यामध्ये ब्लड, पोट, गर्भाशय, तोंड, स्तन या आणि अशा अनेक कॅन्सरचा समावेश आहे. मात्र, डोळ्यांना देखील कर्करोग होऊ शकतो, त्याला वैद्यकीय भाषेत ‘रेटिनोब्लास्टोमा’ म्हणतात. अगदी एक वर्षाच्या मुलापासून ते तीन वर्षे वयापर्यंतच्या मुलांमध्ये हा कॅन्सर आढळून येतो. यामध्ये डोळ्याची बाहुली पांढरी किंवा पिवळसर होणे ही प्राथमिक लक्षणे दिसतात. तसेच याचे वेळीच निदान केल्यास त्यावर चांगले उपचार होऊ शकत असल्याचे मत नेत्ररोग तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
डोळ्याच्या कॅन्सरबद्दल वेगवेगळी करणे असली तरी अनुवंशिकता आणि गुणसूत्रातील दोषामुळे हा आजार बाळाला होऊ शकत असल्याचे प्रमुख कारण पुढे आले आहे. त्यामध्ये विशेष म्हणजे जवळच्या नातेवाइकांमध्ये लग्न केल्यामुळेसुद्धा अशा पद्धतीचा त्रास बाळाला होऊ शकतो. त्यामुळे जवळच्या नातेवाइकांमध्ये लग्न करू नये असे सांगितले जाते. दृष्टिपटलातील सामान्य पेशींची वाढ न झाल्याने हा आजार होऊ शकतो.
अनेकवेळा पालकांना कळते की मुलाच्या डोळ्यात पांढरा किंवा पिवळा डाग आहे. मात्र, काही वेळा आजूबाजूचे नातेवाईक मूल मोठे झाल्यावर व्यवस्थित होईल असे सांगतात. परंतु, पालकांनी कुणाचे न ऐकता शंका आल्यास तत्काळ नेत्ररोग तज्ज्ञांना दाखवून योग्य ती तपासणी करून घ्यावी. कारण वेळेत निदान केल्यास वेळेत उपचार होऊन डोळ्याची नजर वाचविता येते. मात्र, कर्करोगात उशीर केल्यास डोळा काढावा लागतो. तसेच काही वेळा हा कॅन्सर शरीराच्या इतर भागात पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे संपूर्ण आरोग्यच धोक्यात येते. त्यामुळे डॉक्टरांकडून तपासणी करणेच क्रमप्राप्त ठरते.
रेटिनोब्लास्टोमाची लक्षणे?डोळे लाल होणे आणि डोळ्यांभोवती सूज येणे.डोळ्यांमध्ये तिरळेपणा येणे. डोळ्यांमध्ये पांढरी चमक आढळणे. टीव्ही पाहण्यास अडसर होणे. अंधुक दिसायला लागणे. लाईटच्या प्रकाशाचा त्रास.
अशी होती तपासणीया आजाराचे निदान करण्यासाठी डोळ्याची बाहुली मोठी करून तपासतात. त्याला फंडोस्कोपी असे म्हणतात. तसेच ते डोळ्याची सोनोग्राफी व डोळ्याचा सिटी स्कॅन करून बघतात. या वैद्यकीय चाचण्या करून या आजारांचे निदान नेत्ररोग तज्ज्ञ करत असतात.
डोळ्याचा कॅन्सर योग्य उपचाराने बरा होऊ शकतो. यासाठी लेझर, क्रायोफ्रिझिंग, रेडिओथेरपी आणि केमोथेरपीसारखे उपचार उपलब्ध आहेत. एका डोळ्याला त्रास असेल तर दुसऱ्या डोळ्याला त्रासही त्रास होऊ शकतो. वर्षातून एकदा तरी डोळ्यांच्या डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेलेच पाहिजे. डॉ. प्रीतम सामंत, नेत्ररोग तज्ज्ञ आणि रेटिना स्पेशालिस्ट