Join us  

शासनाचा मराठी संवर्धन पंधरवडा मुंबई - पुण्यापुरताच मर्यादित का?, ' या ' साहित्य संघटनेने घेतला आक्षेप

By स्नेहा मोरे | Published: January 14, 2024 11:54 PM

Marathi: राज्यात १४ जानेवारीपासून मराठी भाषा विभागाने मराठी भाषा पंधरवडा निमित्ताने जो ' साहित्य सेतू'  उपक्रम जाहीर केला आहे . हा उपक्रम केवळ मुंबई, पुणे केंद्री व तिथलेच मान्यवर केंद्री का असा प्रश्न राज्यातील इतर विभागांना व बृहन्महाराष्ट्रातीलही संबंधितांना पडत असतो हे लक्षात ठेवणे देखील शासनाचेच काम आहे

मुंबई - राज्यात १४ जानेवारीपासून मराठी भाषा विभागाने मराठी भाषा पंधरवडा निमित्ताने जो ' साहित्य सेतू'  उपक्रम जाहीर केला आहे . हा उपक्रम केवळ मुंबई, पुणे केंद्री व तिथलेच मान्यवर केंद्री का असा प्रश्न राज्यातील इतर विभागांना व बृहन्महाराष्ट्रातीलही संबंधितांना पडत असतो हे लक्षात ठेवणे देखील शासनाचेच काम आहे, अशी तीव्र भावना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे पूर्वाध्यक्ष आणि महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संयोजक डॉ श्रीपाद जोशी यांनी मराठी भाषा विभागाच्या पाठवलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.

केवळ पुण्या- मुंबईतील साहित्यिक व साहित्य संस्थांचा समावेश मराठी संवर्धन पंधरवड्यात केला असल्याने याबाबत मराठी भाषा विभागासह मुख्यमंत्री, मराठी भाषा मंत्री,तसेच विश्वकोश मंडळ सचिव आणि राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक यांना देखील पत्र लिहिण्यात आले आहे. या पत्रात, आम्ही महाराष्ट्राचेच भाग आहोत, वेगळ्या राज्याचे नव्हे,यांचे शासनाला पुनः पुन्हा स्मरण का करून द्यावे लागते? अशी विचारणा करत शासनाला केली आहे.

त्याचप्रमाणे, शासनाला अशा उपक्रमांमध्ये महाराष्ट्राच्या सर्व विभागातील प्रतिभेला सामावून घेणारा सहभाग द्यावा असे धोरण असावे असे का वाटत नाही? असा सवालही जोशी यांनी उपस्थित केला आहे. याबाबत अधिक माहिती देताना महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संयोजक डॉ श्रीपाद जोशी यांनी सांगितले की, शासनाच्या अशा कार्यपद्धतीमुळेच विविध विभागात विलगतेची भावना प्रबळ होण्यास खतपाणी मिळते आणि महाराष्ट्र संयुक्तच राखू इच्छिणाऱ्यांचे बळ क्षीण केले जाते, आहे.त्यायोगे भाषिक , सांस्कृतिक ऐक्याला देखील बाधा पोहचते,हे देखील पत्रातून शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. महाराष्ट्रातील इतर विभागात देखील मान्यवर लेखक, प्रतिभा, विद्वत्ता आहे याचे भान शासनाने राखले पाहिजे असेही या पत्रात म्हटले आहे. 

टॅग्स :मराठीमुंबईपुणे