Join us

मतदार यादीत नाव आहे का? मतदानाच्या दिवशी होणारी गैरसोय टाळण्यासाठी दक्ष राहण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 2:39 PM

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरांतील ३६ विधानसभा मतदारसंघांसाठी २० नोव्हेंबर रोजी निवडणूक होत आहे. उपनगरात १७ ऑक्टोबरपर्यंत ...

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरांतील ३६ विधानसभा मतदारसंघांसाठी २० नोव्हेंबर रोजी निवडणूक होत आहे. उपनगरात १७ ऑक्टोबरपर्यंत पुरुष मतदार ४० लाख ८० हजार आणि महिला मतदार ३५ लाख ६० हजार आहेत. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले जातात. मात्र, मतदारयादीत आपले नाव आहे की नाही, याची खात्री सर्वांनी केली पाहिजे.  

६ लोकसभा आणि ३६ विधानसभा मतदारसंघ असलेले देशातील मुंबई हे एकमेव महानगर आहे. त्यामुळे या महानगरातील निवडणूक प्रक्रियेकडे आणि त्याच्या अंमलबजावणीकडे देशाचे लक्ष  लागले आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी  निवडणूक आयोग विविध उपक्रम राबवते, पण मतदारांचीसुद्धा तितकीच जबाबदारी आहे. आपले नाव मतदार यादीत आहे का? याची पडताळणी मतदार करत नाही आणि निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रावर गेल्यावर आपले नाव यादीत आहे का? याची विचारणा बूथवरील निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांना विचारतात. हे टाळण्यासाठी निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून मतदारांनी आपले नाव मतदार यादीत आहे का, याची पडताळणी केली पाहिजे.

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न

- विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी स्वीपच्या माध्यमातून जनजागृती केली जाते.- लोकशाहीने दिलेला मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावण्यासाठी विद्यार्थ्यांमार्फतही  जनजागृती केली जाते.

मतदार यादीत असे शोधा नाव...

मतदार यादीत आपले नाव शोधण्यासाठी निवडणूक आयोगाने https://electoralsearch.eci.gov.in/ ही वेबसाइट दिली आहे. मतदार यादीत आपले नाव शोधताना प्रथम नाव, विधानसभा आणि जिल्हा, आदी नमूद करून आपले नाव मतदारयादीत आहे की नाही याची खात्री करून घ्यावी.

जाणून घ्या मतदान केंद्र

लोकसभा निवडणुकीनंतर सर्वत्र मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. त्यासाठी आपले मतदान केंद्र जाणून घ्या. अर्थात ‘नो युवर पोलिंग स्टेशन’ ही मोहीम व्यापक स्तरावर राबवली जात आहे. मुंबई कार्यक्षेत्रातील मतदारांना घरबसल्या त्यांचे मतदान केंद्र जाणून घेण्यासाठी सुरू केलेल्या ‘आपले मतदान केंद्र जाणून घ्या’ या उपक्रमाचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी कौतुक केले आहे.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४मतदाननिवडणूक 2024