Join us

राज ठाकरेंवर कारवाई करायला राज्य सरकार घाबरतंय का?; संजय निरुपम यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2022 4:28 PM

राज ठाकरे यांच्याकडून भावना भडकवण्याचं काम सुरू आहे. राज ठाकरेंनी हे काम केलंय, त्यामुळे कारवाई व्हायला हवी, असं संजय निरुपम म्हणाले.

मुंबई- मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबादेतील सिटी चौक पोलिसांनीराज ठाकरेंविरोधात कारवाई केली आहे. १ मे रोजी झालेल्या मनसेच्या औरंगाबाद सभेत पोलिसांनी त्यांना १६ अटींचे पालन करण्याविषयी बजावले होते. त्यातल्या १२ अटींचं उल्लंघन केल्याने राज ठाकरेंवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम ११६, ११७ , १५३ अंतर्गत राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर देखील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. राज्य सरकार राणा दांपत्यावर कारवाई करते. पण राज ठाकरेंवर कारवाई करायला घाबरतंय का?, असा सवालही संजय निरुपम यांनी उपस्थित केला आहे. 

राज ठाकरे यांच्याकडून भावना भडकवण्याचं काम सुरू आहे. राज ठाकरेंनी हे काम केलंय, त्यामुळे कारवाई व्हायला हवी. ती होत नाही. त्यामुळे राज्य सरकारने त्यांच्यावर ठोस कारवाई करावी, असं संजय निरुपम म्हणाले. तसेच उत्तर भारतीयांची राज ठाकरेंनी माफी मागावी, असं विधानही संजय निरुपम यांनी केलं आहे. 

हिंदुत्वाचा अजेंडा चालवण्याआधी, उत्तर प्रदेश सरकारचं कौतुक करण्याआधी राज ठाकरेंनी मुंबईतील उत्तर भारतीयांची माफी मागितली पाहीजे. राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांना मारलं, त्यांच्या मनाला ठेच पोहोचवली आहे, त्यामुळे राज ठाकरेंनी सर्व उत्तर भारतीयांची माफी मागायला हवी, असं मत संजय निरुपम यांनी व्यक्त केलं आहे. 

राज ठाकरे मुख्यमंत्र्यांचे भाऊ असल्याने त्यांच्यावर सौम्य कलमं-  खासदार इम्तियाज जलील 

राज ठाकरे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाऊ असल्याने त्यांच्यावर सौम्य कलमं लावून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी टीका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. इम्तियाज जलील म्हणाले की, माझ्या मनात एक शंका येते, माझा भाऊ आहे, म्हणून मी त्यावर कशाला देशद्रोहाची कलमे लावू. मी नवनीत राणावर देशद्रोहाची कलमे लावू शकतो, मी दुसऱ्यांवर लावू शकतो, असं मुख्यमंत्र्यांना वाटत असेल, अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली आहे. तसेच राणा दाम्पत्याला एक वागणूक आणि राज ठाकरे यांना वेगळी का, ज्या कलामांतर्गत राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे, तीच कलमे राज ठाकरे यांच्यावर लावावीत, अशी मागणी इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारवर केली आहे.    

टॅग्स :राज ठाकरेसंजय निरुपममनसेमहाराष्ट्र विकास आघाडीपोलिस