Join us

पर्यावरणाबाबत राज्य सरकार गंभीर नाही का? अभिनेता सयाजी शिंदे यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2023 12:54 PM

राज्याला स्वतंत्र पर्यावरण मंत्री असू नये? असेही सयाजी शिंदे म्हणाले. यावर नाराजी व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पर्यावरणाच्या ऱ्हासाचा प्रश्न प्रचंड गंभीर आहे. प्रत्येकाने स्वतःहून काहीतरी प्रयत्न करायला हवेत. अशावेळी जर एखादा पर्यावरण प्रेमी  तरुण दखल घेण्यासारखे प्रयत्न करीत असेल तर सरकारकडून त्याची साधी नोंदही घेतली जात नाही. दोन महिने पत्रव्यवहार करून आपले म्हणणे मांडण्यासाठी सरकारकडून साधी परवानगी मिळत नाही, अशी खंत व्यक्त करीत पर्यावरणाबाबत सरकार गंभीर नाही का ?, अशी नाराजीही पर्यावरण प्रेमी, सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी येथे व्यक्त केली.

पिंपरी- चिंचवड येथील अवैध वृक्षतोडी विरोधात जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरण प्रेमी प्रशांत राऊळ सोमवारी मंत्रालयासमोर उपोषण करणार होते. आपले म्हणणे सरकार दरबारी मांडण्यासाठी राऊळ भर उन्हात पिंपरी चिंचवड ते मुंबई अशी सायकल दिंडी करीत मंत्रालयात आले. त्यांना पर्यावरण मंत्र्यांची भेट घ्यायची होती; मात्र मंत्रालयासमोर त्यांना अडवले गेले. आझाद मैदानातही त्यांना जाऊ दिले नाही. उपोषणासाठी त्यांनी दोन महिन्यांपासून पत्रव्यवहार केला होता; मात्र सरकारकडून योग्य माहिती मिळाली नसल्याचे राऊळ यांचे म्हणणे आहे. त्याची फरपट कळताच पर्यावरणाबाबत नेहमी दक्ष असणारे अभिनेते सयाजी शिंदे आपला नियोजित दौरा सोडून आझाद मैदान येथे आले. राऊळ यांची अवस्था पाहून संतापलेल्या शिंदे यांनी आपली खंत व्यक्त करत सरकारकडून पर्यावरण प्रेमींना मिळणाऱ्या वागणुकीबाबत नाराजी व्यक्त केली.

हजारो झाडे कापली जात आहेत. एक जंगल जमीन सुरक्षित नाही. उरलेली जुनी झाडेही कापली जात आहेत. सरकारने पर्यावरणाच्या प्रश्नाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे.  पर्यावरणप्रेमी अभ्यासकांचे म्हणणे ऐकले पाहिजे; मात्र सरकारकडून साधी भेट मिळू नये. राज्याला स्वतंत्र पर्यावरण मंत्री असू नये? असेही सयाजी शिंदे म्हणाले. यावर नाराजी व्यक्त केली.

 

टॅग्स :सयाजी शिंदे