लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: बोरिवली पूर्वेकडे रेल्वे स्थानकापासून ५ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या सुकूरवाडी एसटी आगारात दिवे कमी असल्याने प्रकाश कमी आणि अंधार जास्त अशी व्यवस्था आहे. त्यातही स्वारगेट आगारातील अत्याचाराची घटना ताजी असताना सुकूरवाडी आगारात मागील तीन-चार दिवसांपासून रात्री चक्क सुरक्षा रक्षकच नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आगारातील प्रवाशी सुरक्षेबाबत एसटी महामंडळ किती गंभीर आहे, याचा दाखला मिळतो आहे.
तसेच नॅन्सी कॉलनी आगारातून सुटणाऱ्या सर्व बस येथे थांबतात. याठिकाणी वाहक, चालक आणि कर्मचाऱ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. प्रशासनाने ठेवलेला पाण्याचा कॅनदेखील खर्च परवडत नाही, म्हणून घेणे आता बंद झाले आहे, अशी माहिती येथील कर्मचाऱ्यांनी दिली. येथील आगरव्यवस्थापकांचे केबिन तुटलेल्या अवस्थेत आहे. प्रवाशांना घोषणा देणारा माइक गेली अनेक दिवस बंद असल्याने कोणतीही उद्घोषणा आता येथे ऐकायला मिळत नाही. या आगाराच्या मागील बाजूस झोपडपट्टी असून, तेथील लोकांचा आगारात सर्रास वावर असतो.
प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
दुसऱ्या बाजूला हे आगाराच्या प्रवेशाच्या ठिकाणी दरावाजाच नसल्याने रात्रीच्या वेळी येथे मद्यपी सर्रास प्रवेश करतात. अशा परिस्थितीत प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. हे आगार मुंबईत असले, तरी येथील गैरसोयी पाहता खेडेगावात तर आलो नाही ना, अशी परिस्थिती असल्याची नाराजी प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
आगारात रात्री-अपरात्री दारूडे घुसण्याची समस्या आहे. आम्ही पोलिस बंदोबस्त मागितला आहे. सीसीटीव्हीद्वारे आगारामध्ये करडी नजर असते. एखादी संशयास्पद गोष्ट दिसल्यास लगेच पोलिसांना कळवतो. मात्र, येथे डेपोला दरावाजा हवा, आगारातील रस्ते आणि चारही बाजूला मजबूत संरक्षक भिंत बांधण्याबरोबरच इतर सुविधा लवकरात लवकर सुरू करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. - अरुण निंबा गढरी, सहायक वाहतूक निरीक्षक, सुकुरवाडी, नॅन्सी कॉलनी आगार.