मुंबई - भांडूमपमधील श्रद्धा वालकर हत्याप्रकरणाने महाराष्ट्र हादरला आहे. याप्रकरणी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून पोलीस तपासात दररोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. लिव्ह-इन-पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्याप्रकरणी आफताब अमीन पूनावाला याला दिल्ली कोर्टाने मंगळवारी चार दिवसांची पोलीस कोठडी वाढवून देत त्याच्या पॉलिग्राफ चाचणीस परवानगी दिली. त्याने हा गुन्हा रागाच्या भरात केल्याची कबुली दिल्याचे त्याच्या वकिलांनी सांगितले. आता, श्रद्धाने लिहिलेली चिठ्ठी समोर आली आहे. त्यावरुन, राजकारण रंगत असून भाजप नेते आमदार राम कदम यांनी ठाकरे सरकारलाच दोषी ठरवले आहे.
श्रद्धा आणि आफताब यांचे सुरुवातीपासूनच भांडणं सुरु होती. २३ नोव्हेंबर २०२० रोजी श्रद्धाने आफताबविरोधात तक्रार दाखल केली होती. आफताब हा गळा दाबून मारहाण करत असल्याची तक्रार श्रद्धाने नालासोपारा पूर्वमधील तुळींज पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मात्र १९ डिसेंबर २०२० रोजी श्रद्धाने ही तक्रार मागे घेतली असल्याचे समोर आले आहे. मात्र पोलिसांनी तेव्हाच कारवाई केली असती तर श्रद्धा आज या जगात असती, अशीही चर्चा रंगली आहे. यावर राम कदम यांनी प्रतिक्रिया देताना ठाकरे सरकारला जबाबदार धरलं आहे.
श्रद्धाने स्वत: चिठ्ठी लिहून तिच्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं होतं. त्यावेळी, राज्यात उद्धव ठाकरेंचं महाविकास आघाडी सरकार होतं. त्या सरकारने कारवाई का केली नाही? असा सवाल भाजप नेते आमदार राम कदम यांनी केला आहे. तसेच, जर ते वसुली वसुलीचा खेळ करत बसले नसते, तुष्टीकरणाचं म्हणजे एखाद्याला खुश करण्याचं राजकारण करत नसते तर श्रद्धाचा जीव वाचला असता. कोणासाठी तुष्टीकरणाचं त्यांचं राजकारण होतं, त्यांना कोणाला खुश करायचं होतं. श्रद्धाच्या मृत्युचं कारण हे उद्धव सरकारचं हेच घाणेरडं राजकारण आहे, जर त्यांनी कारवाई केली असती, तर श्रद्धाचा जीव वाचला असता, असेही आमदार कदम यांनी म्हटलं आहे.
त्या पत्रावर फडणवीस काय म्हणाले
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील श्रद्धाने लिहिलेलं पत्र गंभीर असल्याचं म्हटलं आहे. मी श्रद्धाने लिहिलेलं पत्र वाचलं. पत्र लिहूनही पोलिसांनी कारवाई का केली नाही, याची चौकशी करणार आहे. मी कोणावरही आरोप करत नाही. मात्र वेळीच कारवाई झाली असती तर तीचा जीव वाचला असता, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.