मुंबई : कुलाबा-वांद्रे-सिप्झ दरम्यान सुरू होणाऱ्या मेट्रो ३ मार्गिकेचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय मेट्रो रेल कॉर्पोरेशनने घेतला आहे. कफ परेडहून ही मेट्रो मार्गिका पुढे नेव्ही नगरपर्यंत वाढवण्यात येणार आहे. मात्र नेव्ही नगरमध्ये राहणाऱ्या निवडक लोकांसाठी ही मेट्रो मार्गिका वाढवण्याची गरजच काय? असा सवाल करत या खर्चाचा अपव्यय होणार असल्याचे मत वाहतूक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
कुलाबा-वांद्रे-सिप्झ या पहिल्यावहिल्या भुयारी मेट्रो ३ मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात असून मेट्रोच्या चाचण्यादेखील मेट्रो प्रशासनाकडून घेण्यात येत आहेत. या प्रकल्पात २७ मेट्रो स्थानके उभारण्यात आली असून कफ परेडहून नेव्ही नगरपर्यंत ही मार्गिका वाढवण्यात येणार आहे. २०२५ मध्ये या कामाला सुरुवात केली जाणार असून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च येथे हे स्थानक असणार आहे. या प्रकल्पासाठी ३३ हजार कोटींहून अधिक खर्च केले असून नेव्ही नगरच्या अडीच किमी विस्तारासाठी २५०० कोटींचा निधी लागण्याची शक्यता आहे.
धनदांडग्यांसाठी घेतला निर्णयमेट्रो ३ चे विस्तारीकरण मूठभर धनदांडग्यांसाठी असून या विस्तारीकरणाचा मेट्रोला अजिबात उपयोग नाही, असे मत वाहतूक तज्ज्ञ अशोक दातार यांनी व्यक्त केले आहे. इतकेच काय तर दक्षिण मुंबईतील लोकांकडे चारचाकी वाहने असून, त्याद्वारे भविष्यातही करतील, असे दातार यांनी सांगितले.
मुंबईत रेल्वेने प्रति किमी प्रवासासाठी ०.२० पैसे बसने प्रवासासाठी १.५० रुपये, तर मेट्रोसाठी प्रति किमी ३ ते ४ रुपये खर्च येतो. त्यामुळे मेट्रोचा प्रवास इतर सार्वजनिक वाहतुकीपेक्षा महाग असून तो सर्वसामान्यांना परवडणारा नाही. मेट्रो ३ च्या विस्तारीकरणासाठी लागणारे हजारो कोटी रुपये मुंबईतील आवश्यक पायाभूत सुविधांवर खर्च करणे गरजेचे आहे.- अशोक दातार, वाहतूक तज्ज्ञ