शिव प्रतिष्ठान हिंदूस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडेंनी एकापाठोपाठ एक वादग्रस्त विधानांची मालिकाच सुरू केल्याचं गेल्या काही दिवसांत पाहायला मिळालं. अगोदर महात्मा गांधी, नंतर महात्मा फुले आणि आता शिर्डीच्या साईबाबांबद्दल त्यांनी वादग्रस्त विधान केलं. देशातील कोट्यवधी जनतेचं श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांबद्दल अपशब्द वापरत ते सोन्याच्या सिंहासनावर जाऊन बसल्याचं संभाजी भिडेंनी म्हटलं होतं. भिडेंच्या या विधानावरुन लोकं रस्त्यावर उतरली. तर, विधानसभेतही गोंधळ झाला. आता, आमदार रोहित पवार यांनी संभाजी भिडेंचा संबंध भाजपशी जोडला जात असल्याचं म्हटलं आहे.
संभाजी भिडेंनी अमरावतीत केलेल्या भाषणाचे व्हिडीओ समोर आले असून, त्यात संभाजी भिडे हे महात्मा फुले, राजाराम मोहन रॉय यांच्याबद्दल अर्वाच्य भाषेत बोलत आहेत. तर साईबाबांनाही शिवीगाळ करताना दिसत आहे. भिंडेंच्या या व्हिडिओवर राज्यभरातून संताप व्यक्त होत असून विधानसभेतही त्याचे पडसाद पाहायला मिळाले होते. तर, साईबाबांबद्दल केलेल्या विधानानंतरही भाविकांच्या भावना दुखावल्याने त्यांनीही निषेध व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली आहे. आता, आमदार रोहित पवार यांनी भिंडेंचा संबंध भाजपाशी असल्याचं म्हटलंय.
''राज्यातील एक व्यक्ती कित्येक दिवसांपासून सुरुवातीला महिला भगिनींबाबत, त्यानंतर महात्मा फुले, महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्याबाबत आणि आता जगभरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांविषयी उघडपणे गरळ ओकत असताना सरकार मात्र काहीही कारवाई करत नाही. उलट या दुष्प्रवृत्तीला रोखण्याऐवजी एक भाजप खासदार उघडपणे त्याची बाजू घेतो... यावरून आजच्या ज्वलंत प्रश्नावरून इतरत्र लक्ष वळवण्यासाठी भाजपनेच रचलेला हा कट असल्याचं सामान्य लोकांचं मत आहे. पण, हे असंच चालू राहिलं आणि लोकांनी कायदा हातात घेतला तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल.'', अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
साईबाबांबद्दल काय म्हणाले भिडे
"हिंदू समाज साईबाबाला पुजतो. तो साईबाबा काय लायकीचा ##वा आहे, एकदा पाहा तुम्ही. मी काय बोलतोय, जागा आहे बरं का… मी काय टकूरं सरकलेला माणूस नाहीये. हराम@#$ साईबाबा देवाच्या सिंहासनावर जाऊन बसलाय", अशा अर्वाच्य भाषेत संभाजी भिडेंनी साईबाबांवर टीका केलीये. त्यामुळे भिडेंवर विरोधकांकडून चांगली टीका होत आहे. दरम्यान, येथील भाषणात संभाजी भिडेंनी महाराष्ट्रातील समाज सुधारकांबद्दलही वादग्रस्त विधान केले. “महाराष्ट्रात लोकहितवादी, महात्मा फुले हे नाव घेतल्यावर तुमच्या अंगाला झोंबलं असेल, सगळे सगळे 2 तास सांगू शकतो. प्रत्येकाच्या ढुं@#$ वर देशद्रोहाचे काय काय शिक्के आहेत ते”‘, असे अकलेचे तारे भिडेंनी तोडले.
गांधीजींबद्दल वादग्रस्त विधान
करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नाहीत. ते मुस्लीम जमीनदाराचे पुत्र असल्याचे वक्तव्य संभाजी भिडेंनी केले. इतकेच नाही तर मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केल्याचा दावा संभाजी भिडेंनी केला. या विधानानंतर काँग्रेस नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केले आहे.
भिडेंबद्दल फडणवीसांची भूमिका
संभाजी भिडे गुरुजींनी जे वक्तव्ये केले त्याचा मी निषेध करतो. महात्मा गांधी देशाचे राष्ट्रपिता आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात महानायक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अशा महानायकाबाबत असं विधान करणे अत्यंत चुकीचे आहे. भिडे गुरुजी असो वा कुणीही अशी विधाने करू नये. याबाबत जी काही कारवाई आहे ती राज्य सरकार उचितपणे करेल असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
संभाजी भिडेंचा भाजपशी संबंध नाही
कोट्यवधी लोकं अशा विधानाने संतप्त होतात. लोकं महात्मा गांधीविरोधात असं बोलले कधीही सहन करणार नाहीत. महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर कुणाबद्दलही असो आम्ही बोललेले सहन करणार नाही. संभाजी भिडे यांचा भाजपाशी काहीही संबंध नाही. ते त्यांची संघटना चालवतात. त्यामुळे याला राजकीय रंग देण्याचं कारण नाही असं स्पष्ट शब्दात फडणवीसांनी सांगितले.