Join us

हे सरकार पुरोगामी की हिंदुत्ववादी?; सपाचा थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2022 3:36 PM

मागील अडीच वर्षात अल्पसंख्याकांसाठी काय केले? अल्पसंख्याक आयोग, हज कमिटी, आर्थिक महामंडळाची नियुक्ती झाली नाही अशी नाराजी समाजवादी पक्षाने व्यक्त केली आहे.

मुंबई - ज्या किमान समान कार्यक्रमावर या सरकारची स्थापना झाली होती. त्यानंतर गेल्या १ वर्षभरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिंदुत्वाची भाषा बोलतात. मविआचा किमान समान कार्यक्रम आणि उद्धव ठाकरेंच्या विचारात तफावत झाली. हे सरकार पुरोगामी आहे की माझं हिंदुत्व मोठं की भाजपाचं हिंदुत्व यावर शिवसेनेने स्पष्टीकरण द्यायला हवा असं समाजवादी पक्षाचे(SP) आमदार रईस शेख यांनी म्हटलं आहे. 

परिवहन मंत्री अनिल परब(Anil Parab) यांची भेट घेतल्यानंतर रईस शेख यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यसभा निवडणुकीसाठी अपक्ष आणि घटक पक्षांच्या आमदारांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. मात्र समाजवादी पक्षाने महाविकास आघाडी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे समाजवादीची २ मते शिवसेनेच्या उमेदवाराला मिळतील का यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. 

आमदार रईस शेख म्हणाले की, मागील अडीच वर्षात अल्पसंख्याकांसाठी काय केले? अल्पसंख्याक आयोग, हज कमिटी, आर्थिक महामंडळाची नियुक्ती झाली नाही. ही लोकांची मागणी आहे. आमच्या पत्राची दखल घेऊन त्यावर आम्हालाच नाही तर महाराष्ट्राला उत्तर द्यावं. आम्ही आमचे मुद्दे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासमोर मांडले आहेत. सरकारच्या पुरोगामीत्वावर प्रश्नचिन्ह आहे. त्यावर स्पष्टीकरण द्यायला हवं. समाजवादी पक्ष महाविकास आघाडीसोबत आहे परंतु यावर स्पष्टीकरण द्यायला हवं असं त्यांनी सांगितले. 

तसेच आम्हाला कुठल्याही बैठकीला जाण्याची गरज नाही. आम्ही महाविकास आघाडीच्या बैठकीला जाणार नाही. आमची लढाई वैचारिक आहे. अडीच वर्षात जे सरकारमध्ये बदल झालेत त्याची नोंद घ्यायला हवी. सरकारची एक स्पष्ट भूमिका ठेवायला हवी. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आमचं काही ठरलं नाही. जे अबु आझमी सांगतील तीच आमची भूमिका असेल. देशात पुरोगामी आणि हिंदुत्व असे २ विचार आहेत. पुरोगामी विचारात सगळ्यांना सोबत घेऊन जातात. परंतु मागील वर्षभरात उद्धव ठाकरे हिंदुत्वाबाबत सातत्याने बोलत आहेत ते महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात नाही. आम्ही सरकारला पुन्हा मार्गावर आणण्याचा प्रयत्न करतोय असंही समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :राज्यसभाशिवसेनासमाजवादी पार्टीअबू आझमी