लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : उपनगर आणि मुंबई जिल्हाधिकारी यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी, तसेच अनेक सरकारी कार्यालयासमोर रस्त्याच्या बाजूला गाड्यांवर अन्नपदार्थांची सर्रास विक्री होते. या ठिकाणी कुठलीच स्वच्छता पाळली जात नाही. पिण्याचे पाणीही चांगले दिले जात नाही. संबंधित विभागांकडून तपासणी आणि कारवाई होत नसल्याने असे घातक अन्नपदार्थ नागरिकांसाठी विष झाले आहे.
वांद्रे (पूर्व) येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाला लागूनच खाद्यविक्रेते आहेत. येथील अनेक दुकानांत समोसा, वडापाव आणि फ्रँकी विकली जाते, तसेच काही दुकानांत चायनीज भेळ विकली जाते. हे खाद्यपदार्थ बनविताना तेल, पाणी, स्वच्छता याची पाहणी होत नसल्याचे दिसते.
तळण्यासाठी तेलाचा पुन्हा-पुन्हा वापररस्त्यावर तयार केले जाणारे अन्नपदार्थ सर्रास कमी दर्जाच्या तेलात केले जातात. त्या तेलाचा दर्जाही कधी कोणी तपासलेला नसतो. दोन ते तीन वेळा वापरलेल्या तेलाचा वापर पुन्हा पुन्हा होतो. असे तेल आणि त्यात तयार केले जाणारे अन्नपदार्थ पॉयझनसारखेच असतात.
चर्चगेट रेल्वेस्थानकाबाहेर दोन्ही बाजूस अनेक सरकारी कार्यालये आहेत. तरीही येथे मोठ्या प्रमाणात रस्त्यावरच खाद्यपदार्थ विकले जातात. हे पदार्थ बनविताना कोणतीही काळजी घेतली जात नाही.
दादर रेल्वेस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी असते. येथेही दिवसा आणि रात्री खाद्यपदार्थ विक्रेत्याच्या गाड्या लागतात. या गाड्यांवर अन्नपदार्थ तयार करताना कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नसल्याचे दिसते.
जळलेले तेल, अस्वच्छ पाणीकोठेही रस्त्यावर तयार केलेले अन्नपदार्थ निरखून पहिले तर असे दिसते की, हे पदार्थ तळण्यासाठी वापरलेले तेल हे जाळलेलेच असते. ते जळून काळे झालेले असते. शिवाय अन्नपदार्थ तयार करताना साधी स्वच्छताही पाळली जात नाही. त्यामुळे पदार्थ आणि वस्तूंवर डास बसतात.
यांना कोण आवरणार? दादर येथील हातगाड्यांवर वापरल्या जाणाऱ्या प्लेट्स एकाच पाण्यातून बुडवून काढल्या जातात. तशीच प्लेट ग्राहकाला दिली जाते. त्यामुळे संसर्ग होऊन पोटदुखीचा त्रास होतो. यावर कोणीही कारवाई करीत नाही. यांना कोण आवरणार, असा सवाल सुधीर शिंदे यांनी केला आहे. अन्न पदार्थात तेलाचा किंवा कोणत्याही भेसळयुक्त पदार्थाचा वापर होत असेल तर त्याची तक्रार अन्न प्रशासन कार्यालयात किंवा हेल्पलाइनवर करू शकता.