Join us

तुमची गाडी निरोगी आहे का? फिटनेस तपासण्यासाठी ४३ अत्याधुनिक केंद्रे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 9:49 AM

वाहनधारकांकडून वाहनांच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असून, त्यामुळे वाहनांचा फिटनेस राहत नाही. त्यामुळे अपघातांसोबत वायुप्रदूषणही होते.

मुंबई : वाहनधारकांकडून वाहनांच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असून, त्यामुळे वाहनांचा फिटनेस राहत नाही. त्यामुळे अपघातांसोबत वायुप्रदूषणही होते. याची दखल घेत आणि यावर उपाय म्हणून परिवहन विभागाने पाऊल उचलत यापुढे वाहनांची फिटनेस तपासणी काटकोरपणे करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. यासाठी राज्यभरात ६०० ते ७०० कोटी रुपये खर्च करून ४३ अत्याधुनिक वाहन तपासणी सेंटर उभारली जाणार आहेत. यामुळे वाहने अधिक फिट राहण्यास मदत होईल, असा दावा केला जात आहे.

मुंबईसह महाराष्ट्रातील वाहनांची संख्या वाढत आहे. राज्यातील वाहनांची संख्या चार कोटींच्या पुढे गेली आहे. त्यामुळे वाहनांची प्रत्यक्ष तपासणी करून त्यांचा फिटनेस देताना कसरत करावी लागते. वाहनांची तांत्रिक तपासणी काटेकोरपणे नाही झाली तर फिट नसलेली वाहने रस्त्यावर उतरतात. परिणामी अपघात होतात. या कारणाने आरटीओ कार्यालयातच वाहनांची अत्याधुनिक उपकरणांच्या माध्यमातून तपासणी करता यावी म्हणून परिवहन विभाग ताडदेव, अंधेरी, कुर्ला व ठाण्यासह ४३ ठिकाणी फिटनेस तपासणी सेंटर उभारणार आहे.

            सेंटरच्या उभारणीवर १४-१५ कोटी रुपये खर्च केले जाणार.

            बंदिस्त शेडमध्ये फिटनेस स्पॉट उपकरणांसह सज्ज होईल.

            वाहन सेंटरमध्ये दाखल झाल्यावर सर्व तपासण्या करूनच बाहेर पडेल.

            जर काही त्रुटी असल्यास वाहन अनफिट केले जाईल.

            वाहन दुरुस्त करून आणल्यावर पुन्हा तपासणी करून फिटनेस दिला जाईल.