Join us  

आपले नाव मतदार यादीत आहे का? ॲपवर तपासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 11:18 AM

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यासाठी शासनाकडून मतदार नोंदणीसाठी आवाहन केले जात आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यासाठी शासनाकडून मतदार नोंदणीसाठी आवाहन केले जात आहे. मतदारांना त्यांची मतदार म्हणून नोंदणी झाली आहे का नाही, तसेच नोंदणीनंतर आपले नाव प्रत्यक्ष मतदार यादीत आले की नाही, हे घरबसल्या जाणून घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने वोटर हेल्पलाइन ॲप सुरू केले आहे. सीईओ महाराष्ट्रच्या अधिकृत अकाउंटवरून यासंदर्भात माहिती दिलेली आहे.

कसे शोधाल नाव ? 

नावाच्या तपशीलाचा वापर करून नाव शोधण्यासाठीसुद्धा पर्याय आहे. त्यावर नाव, आडनाव, वडील किंवा पतीचे नाव, वय, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघाचे नाव हा तपशील भरावा लागतो. त्यानंतर सर्च बटणावर क्लिक करून योग्य तपशील भरावा. लगेच मतदार यादीतील तुमच्या नावाचा तपशील दिसेल. हा तपशील व्हॉट्सॲप, फेसबुक, मेल, एक्स किंवा इतर ठिकाणी शेअर करता येतो. 

मुंबईकरांना आवाहन - 

१) लोकसभा निवडणुकीची घोषणा झालेली आहे. अजूनही ज्यांनी आपली मतदार नोंदणी केलेली नाही. त्यांना नोंदणी करता येईल. 

२) मतदार यादीत नोंद असलेल्यांना आपला पत्ता, नाव, वय यात दुरुस्त करता येईल. त्यासाठी तुम्हाला जर मतदार यादीत तुमचे नाव शोधायचे असेल तर वेळ घालवू नका आणि या ॲपच्या मदतीने लगेच माहिती मिळवा, असे आवाहन मुंबई जिल्हा आणि उपनगर जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.

डाउनलोड करा ‘मतदार हेल्पलाइन’ -

मतदार हेल्पलाइन मोबाइल ॲपवरून मतदार यादीत नाव शोधण्यासाठी प्रथम हे ॲप डाउनलोड करावे. त्यानंतर लॉग इन केले की मुख्य पानावर ‘सर्च युअर नेम इन इलेक्टोरल रोल’ असा पर्याय येईल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर मतदार यादीतील नाव तपासण्यासाठी एक पान तुमच्या समोर येईल. तेथे तुमच्या मतदार ओळखपत्रासह मोबाइल क्रमांक, मतदार ओळखपत्रावरील बारकोड, क्यूआर कोड स्कॅन करून मतदार यादीत आपले नाव तपासता येते. 

टॅग्स :मुंबईलोकसभा निवडणूक २०२४मतदान