Join us

इसिसला होते मुंबईतून फंडिंग

By admin | Published: July 14, 2016 2:22 AM

मालवणीतील चार तरुण इसिसमध्ये भरती होण्यासाठी गेले होते. त्यापाठोपाठ सीएसटी परिसरातील हॉकरकडून इसिससाठी निधी गोळा केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे

मनीषा म्हात्रे,  मुंबईमालवणीतील चार तरुण इसिसमध्ये भरती होण्यासाठी गेले होते. त्यापाठोपाठ सीएसटी परिसरातील हॉकरकडून इसिससाठी निधी गोळा केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. गोवंडीतील एका महिलेने याविरुद्ध आवाज उठवला. मात्र प्रकरण दाबण्यासाठी पोलिसांकडूनच दबाव आणण्यात येत आहे. त्यामुळे न्याय कोणाकडे मागावा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. याप्रकरणी एटीएसकडूनही तपास सुरू करण्यात आला आहे. मालवणीतले चार तरुण ‘इस्लामिक स्टेट आॅफ इराक अ‍ॅन्ड सीरिया’मध्ये (इसिस) दाखल होण्यासाठी गेले. त्यापैकी तिघांना परत आणण्यास तपास यंत्रणेला यश आले. तसेच तपास यंत्रणेने राज्यातील इसिसचे जाळे नष्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात धडक कारवाई राबविली. त्यामुळे गेले काही दिवस हे प्रकरण थंडावले होते. दरम्यान, सीएसटी परिसरात बसणाऱ्या फेरीवाल्यांकडून इसिससाठी निधी गोळा केला जात असल्याची माहिती गोवंडीतील यास्मीन शेख या महिलेने उघडकीस आणली. यास्मीन यांचाही या परिसरात गॅस लायटर विक्रीचा व्यवसाय आहे. त्यानुसार गेल्या वर्षभरापासून शब्बीर शेख नावाचा इसम हा इसिसचा महाराष्ट्र प्रमुख असल्याचे सांगून निधी गोळा करत असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. प्रत्येक फेरीवाल्याकडून दिवसाला ४०० ते ५०० रुपये उकळले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पैसे न दिल्यास मारझोड करून खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याची भीती दाखवली जात असल्याचे यास्मीन यांचे म्हणणे आहे. मात्र शब्बीरच्या या दहशतीविरुद्ध यास्मीन यांनी आवाज उठवल्याची माहिती पोलिसांना दिली. हाच राग मनात धरत शब्बीरने शेख कुटुंबीयांना मारझोड करत त्रास देण्यास सुरुवात केली. गेल्या सहा महिन्यांत पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करत हात वर केल्याचा आरोप शेख करत आहेत. शब्बीर शेखचे देशी दारूचे दुकान असल्याची माहितीही समोर आली आहे. हे प्रकरण दाबण्यासाठी शब्बीर साध्या गणवेशातील पोलिसांसोबत यास्मीनच्या घरी येतो. शिवाय खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याची भीती घालून ५० हजारांची मागणी करत असल्याचेही यास्मिन यांनी सांगितले. याबाबतही त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षासदेखील माहिती दिली आहे. मात्र पुन्हा असे पोलीस आल्यास चौकशी करू, असा सल्ला यास्मीन यांना देण्यात आला. शब्बीरच्या दहशतीमुळे घराबाहेर पडणे कठीण बनल्याचे यास्मीन यांचे म्हणणे आहे. शबीरची वाढती भीती त्यात पोलिसांकडून मिळत असलेल्या असहकार्यामुळे शेख कुटुंबीयांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. यास्मीन या पती सय्यद आणि पाच वर्षांची मुलगी माहेनूरसह गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषणासाठी बसल्या आहेत. रविवारी त्यांची प्रकृती जास्त खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्या पुन्हा उपोषणाला बसल्या आहेत. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही येथून हटणार नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सर्वांना भीती आहे, मात्र आवाज उठविण्यासाठी सगळेच घाबरत असल्याचे तिचे म्हणणे आहे.माझा काही संबंध नाहीमला इसिस बाबत काहीही माहिती नाही. मी कुणाकडूनही पैसे उकळलेले नाही. यास्मीनच माझ्याविरोधात खोटी माहिती पसरवित आहे. मी वडापावचा धंदा चालवून माझ्या कुटुंबियांचा उदर्निवाह करतो. या महिलेच्या भितीने आम्ही दुसरीकडे रहायला आलो अशी माहिती शब्बीर शेखने लोकमतशी बोलताना दिली. अनेकदा खोट्या तक्रारी करुन तिने पोलिसांच्याही नाकीनऊ आणले आहे. त्यामुळे या महिलेवरच कारवाई होणे गरजेचे असल्याचे शेखचे म्हणणे आहे.