मुंबई : इसिसचा सदस्य असल्याचा दावा करत पोलिसांनी अटक केलेल्या २८ वर्षीय तरुणाची उच्च न्यायालयाने शुक्रवारी जामिनावर सुटका केली.
आरोपी इकबाल अहमद कबीर अहमद याने विशेष न्यायालयाने जामीन नामंजूर करण्याच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकेवरील सुनावणी न्या. एस.एस. शिंदे व न्या. एन.जे. जमादार यांच्या खंडपीठापुढे होती. ‘विशेष न्यायालयाचा आदेश रद्द करण्यात येत आहे. अर्जदार (अहमद) याची एक लाखाच्या जामिनावर सुटका करण्यात येत आहे. त्यासाठी त्याने एक किंवा दोन हमीदार सादर करावेत,’ असे न्यायालयाने अहमद याची जामिनावर सुटका करताना म्हटले.
न्यायालयाने अहमदला पहिल्या महिन्यात एनआयएच्या कार्यालयात आठवड्यातून दोनदा व त्यानंतर पुढील दोन महिन्यात आठवड्यातून एकदा हजेरी लावण्याचे निर्देश दिले.
तसेच अहमदने खटल्याच्या प्रत्येक सुनावणीस न्यायालयात हजर राहावे आणि कोणत्याही साक्षीदाराशी संपर्क साधू नये, असेही न्यायालयाने म्हटले. अहमद याला ७ ऑगस्ट २०१६ रोजी यूएपीएअंतर्गत अटक करण्यात आली. इसिस या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.
सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, अहमद हा इसिसच्या ‘परभणी पॅटर्न’मध्ये सहभागी झाला होता. परभणीच्या पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयावर हल्ला करण्याची त्यांची योजना होती.
अहमदच्या विरोधात पोलिसांकडे पुरावे नाहीत. खटला अद्याप सुरू झाला नाही आणि १५०हून अधिक साक्षीदार या प्रकरणात आहेत, असे अहमद याचे वकील मिहीर देसाई यांनी न्यायालयाला सांगितले.