Join us  

इसिसचा शस्त्रप्रशिक्षणाचा कट होता

By admin | Published: April 15, 2016 2:52 AM

इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरियाच्या (इसिस) भारतातील गटाचा प्रारंभीचा कट हा महाराष्ट्र आणि छत्तीसगढच्या जंगलांत शस्त्रे आणि स्फोटकांच्या प्रशिक्षणाचा होता

- डिप्पी वांकाणी,  मुंबई

इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरियाच्या (इसिस) भारतातील गटाचा प्रारंभीचा कट हा महाराष्ट्र आणि छत्तीसगढच्या जंगलांत शस्त्रे आणि स्फोटकांच्या प्रशिक्षणाचा होता, परंतु या दोन्ही ठिकाणी नक्षलवाद्यांशी चकमकी व नक्षलवाद्यांकडून हल्ले होण्याच्या भीतीतून ही ठिकाणे कर्नाटकामध्ये हलविली गेली, असे सुरक्षा यंत्रणेतील सूत्रांनी सांगितले. इसिसचा हा कट नुकताच उघडकीस आला होता. इसिसचे काम करणासाठी युवकांना मोहात पाडणाऱ्या व त्यांचे नियंत्रण करणाऱ्या विदेशी व्यक्तींनी इसिसच्या हाती जगाचे नियंत्रण आले की तुम्हा प्रत्येकाला भारताच्या विशिष्ट भागाची जबाबदारी दिली जाईल, असे सांगितले होते. इसिसचे काम करणाऱ्या किमान १४ जणांना राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए), महाराष्ट्र दहशतवादविरोधी तुकडी (एटीएस) व इतरांनी केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये नुकतीच अटक करण्यात आली होती. अटक झालेल्यांमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर मुदब्बीर शेख (रा. मुंब्रा) आणि रिझवान सिद्दिकी (रा. उत्तर प्रदेश) यांचा समावेश होता. इसिसने भारतात मुदब्बीरला ‘आमिर’ हा दर्जा दिला होता तर रिझवानला त्याचा प्रतिनिधी (डेप्युटी) बनवला होता. भारतात इसिसमध्ये युवकांनी दाखल व्हावे यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी रिझवानकडे दिली होती व त्यासाठी त्याने उभा आडवा असा खूप प्रवास केला होता. रिझवानने मोहसिन शेखचा (रा. मालवणी) मेंदू ‘तयार’ (ब्रेनवॉशड्) केला होता व मोहसिनने मग वाजिद शेख आणि नूर मोहम्मद (दोघेही रा. मालवणी) यांची तशी मानसिकता घडविली, असे गुप्तचर यंत्रणेतील सूत्रांनी सांगितले.सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार अयाझ सुलतान (रा. मालवणी) हा अफगाणिस्तानात गेला असून इसिसला पाठिंबा देणाऱ्या तालिबानची शाखा अन्सार-उल- तौफिकमध्ये सहभागी झाल्याचे समजते. हा तौफिक मालवणीतील त्याच्या खोलीत इसिसच्या आॅपरेटिव्ह्जची नियमित बैठक घ्यायचा. ते त्यांचे कट कसे अमलात आणता येतील यावर बैठकांत विचार करायचे. शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांचे या आॅपरेटिव्ह्जना प्रशिक्षण देण्याचा त्यांचा विचार होता व ही बाब कोणाच्या लक्षात येऊ नये अशा घनदाट जंगलांच्या शोधात ते होते. असे हा अधिकारी म्हणाला.रिझवानने स्फोटके साठवून ठेवण्यासाठी आधीच गोवा आणि कर्नाटकात सुरक्षित घरांचा शोध सुरू केला होता. त्यांची मनोभूमिका अशी काही बनविण्यात आली होती की एकदा इसिसने भारताचा ताबा मिळविला की अनेक विभागांवर आपलेच राज्य चालेल. मुंबई, हैदराबादसारख्या शहरांचे तसे वितरणही त्यांच्याकडून झाले होते. हे युवक लष्करात असतात ती पदे मनाने उपभोगतही होती. उदा. मुदब्बीर स्वत: पदाने ‘आमिर’ असल्यामुळे कधीही मालवणी युवकांशी बोलला नाही तर हे काम त्याने त्याच्या हाताखाली असलेल्या रिझवानकडे दिले होते. त्याचप्रमाणे रिझवानही मालवणीतील इ तरांशी फार संपर्कात नव्हता कारण मोहसिनला हे काम देण्यात आले होते, असे या अधिकाऱ्याने सांगितले.मैं इसिस को मानता हूँ‘‘जब तक मैं आपकी कस्टडीमें हूँ, आपका सून रहा हूँ. मगर मैं इसिसकोही मानता हूँ,’’ अगदी या शब्दांत मुदब्बीरने त्याची चौकशी करणाऱ्यांना सांगितले होते. मुदब्बीर हा इसिसमध्ये अतिशय कडवा असून तो तुरुंगात असला तरी युवकांना मूलतत्ववादी बनवू शकतो अशी भीती आम्हाला असल्याचे सूत्रांनी सांगितले.प्रशिक्षणाची त्यांचा पहिला कट हा छत्तीसगढ व महाराष्ट्रातील जंगलांसाठी होता. परंतु तेथे आपली गाठ नक्षलवाद्यांशी पडेल व त्यांच्याकडून हल्ले होऊ शकतात या भीतीतून कर्नाटकातील जंगलांची निवड त्यांनी केली.