इस्कॉनला मिळाला ग्रीन चॅम्पियन पुरस्कार; निसर्गविषयी जनजागृती केल्याबद्दल गाैरव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2020 12:36 AM2020-11-10T00:36:07+5:302020-11-10T00:36:13+5:30
आयजीबीसीने केला जाहीर
मुंबई : ग्रीन बिल्डिंग काँग्रेसच्या नुकत्याच आयोजित झालेल्या अठराव्या आवृत्तीत इस्कॉनला यंदाचा ग्रीन चॅम्पियनशिप पुरस्कार जाहीर झाला आहे. जनतेला निसर्गाविषयी संवेदनशील बनविण्यासाठी सतत अग्रणी राहिल्याने इस्कॉन या संस्थेला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
इस्कॉन गोवर्धन इकोव्हिलेजचे संचालक गौरंगा दास यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी ते म्हणाले की येत्या काळात इस्कॉनच्या वतीने भक्तिवेदांत संशोधन केंद्राच्या विद्यापीठाची रचना व बांधकाम ग्रीन कॅम्पस या संकल्पनेवर आधारित करण्यात येणार आहे. इस्कॉनची जगभरातील ७०० मंदिरं उपासनेची ग्रीन केंद्रे म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. यासाठी इस्कॉनची आंतरराष्ट्रीय ग्रीन कमिटी आयजीबीसीबरोबर कार्यरत आहे.
इस्कॉनचे आध्यात्मिक गुरू आणि गोवर्धन इकोव्हिलेजचे संस्थापक राधानाथ स्वामी यांनी सांगितले की भगवद्गीतेनुसार योग म्हणजे शरीर, मन, आत्मा, प्राणी, देव आणि निसर्गाशी सुसंगत राहण्याची कला आहे. निसर्ग ही देवाची देणगी आहे आणि या निसर्गामध्येच आपण देवाला पहायला हवे. हेच आम्ही इस्कॉनच्या वतीने जगभरात पोहोचवत आहोत. यावेळी फोर्ड मोटर्सचे अल्फ्रेड फोर्ड म्हणाले की आम्ही ग्रीन अजेंडाच्या अनुषंगाने बरेच काही करत आहोत आणि यात आम्हाला यश मिळेल अशी आशा आहे. कोलकत्यातील मायापूर येथे आम्ही ताजमहल पेक्षाही उंच मंदिर तयार करणार आहोत. जेथे एका वेळी दहा हजार भाविक जप करू शकतात.यावेळी गोपाळ कृष्ण गोस्वामी, जयपताका स्वामी आणि अनुत्तमा प्रभू यांनी आयजीबीसीचे आभार मानले.