‘इस्लामिक काउंटर टेरेरिझम काउन्सिल’ रोखणार दहशतवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 12:22 AM2018-07-24T00:22:40+5:302018-07-24T00:22:55+5:30
शांतीचा संदेश देण्याचा प्रयत्न; विचारवंत, धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते, र्सुिशक्षित वर्गाला जोडणार
मुंबई : जगभरात पसरलेल्या दहशतवादाच्या कर्करोगाला आळा घालण्यासाठी प्रेमाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहे. दहशतवादाला रोखण्यासाठी ‘इस्लामिक काउंटर टेरेरिझम काउन्सिल’ची स्थापना करण्यात आली आहे.
मुस्लीम समाजातील विचारवंत, धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते आणि सुशिक्षित वर्गाला या काउन्सिलसोबत जोडण्यात येईल व त्या माध्यमातून जगभरात शांतीचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, अशी माहिती या काउन्सिलचे समन्वयक डॉ. रेहमान अंजारिया यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. साकीनाका येथील मद्रसा दारूल उलूम अली हसन अहले सुन्नत येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात याबाबत चर्चा करण्यात आली व या काउन्सिलची स्थापना करण्यात आली.
या परिषदेची मुंबईत व दिल्लीमध्ये कार्यालये असतील. या परिषदेच्या कार्यकारी समितीमध्ये देशातील ५१ व जगभरातील ४९ जणांचा अशा एकूण १०० जणांचा समावेश असेल. जगभरातून या परिषदेमध्ये १० लाख जणांना जोडण्याचे उद्दिष्ट अंजारिया यांनी डोळ्यासमोर ठेवले आहे.
इस्लामच्या नावावर बेरोजगार तरुणांचे माथे भडकविण्याचे प्रकार अनेकदा होतात. जिहादची चुकीची संकल्पना सांगून, त्या तरुणांना दहशतवादाकडे वळविले जाते. मात्र, अशा प्रकारच्या परिषदेच्या माध्यमातून तरूणांमध्ये जागृती करण्याची गरज या वेळी व्यक्त करण्यात आली.