लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) शहरातील काही संशयित औषध विक्रेत्यांच्या दुकानांवर छापे सुरू आहेत. त्यात शहर आणि उपनगरांतील काही भागात मोठ्या प्रमाणावर बनावट औषधे आणि इंजेक्शने विकली जात असल्याचे समोर आले आहे. अशा दुकानांवर कारवाई करून गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. सुमारे ३१ कोटी रुपयांची बनावट औषधे व इंजेक्शन्स मुंबईकरांनी विकत घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.
अहमदाबाद येथील मेसर्स इन्टास फार्मास्युटिकल्स लिमिटेड या कंपनीचे ‘ह्यूमन नार्मल इम्युनोग्लोब्युलिन फॉर इंट्राव्हिनस आयपी १० टक्के सोल्यूशन’ हे बनावट औषध बाजारात विकले जात होते. कंपनीने माहिती दिल्यावर औषध नियंत्रकांनी मुंबईत शोध सुरू केला. त्यात वडाळा येथील फार्माकेअर स्पेशालिटी येथे छापा टाकण्यात आला होता. यावेळी काही बनावट औषधे त्यांना सापडली. ती औषधे जप्त केल्याचे वांद्रे येथील औषध प्रशासन कार्यालयाने सांगितले. जवळपास ३१ कोटी रुपयांची बनावट औषधे व इंजेक्शन्सची विक्री मुंबईत झाली आहे.
बनावट औषधांचा तपास करताना भिवंडी येथून २६० इंजेक्शनची खरेदी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यातील २५८ इंजेक्शनची विक्री मुंबई व आसपासच्या परिसरातील झाली आहे. त्यानुसार भिवंडी, परळ, भांडुप, नेरळ येथील विक्रेते आणि मेडिकल्सचा समावेश आहे.
याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, बनावट औषध कोठे बनविण्यात आले याचा तपास करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन आणि पोलिस विक्रेत्यांचा शोध घेत आहे. असे असले तरी शहर आणि उपनगरांतील अनेक औषधाच्या दुकानांमधून बनावट औषधे आणि इंजेक्शन विकली गेली आहेत.